
MPSC : आंदोलक विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबतच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीबाबत मोठा निर्णय
पुणे - राज्यसेवेच्या वर्णनात्मक परीक्षा पद्धतीची अंमलबजावणी २०२५ पासून व्हावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे सलग तिसऱ्या दिवशीही आंदोलन चालू आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) राज्यसेवेत तुर्तास बदल करण्यात येणार नाही, असे परिपत्रक निघत नाही, तो पर्यंत आंदोलनावर ठाम राहणार असल्याचा निर्धार आंदोलक उमेदवारांनी व्यक्त केला आहे. त्यातच विद्यार्थी प्रतिनिधी आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीबाबत मोठा निर्णय झाला आहे.
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांची उद्या बैठक निश्चित झाली आहे. बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार आहेत. शरद पवारांनी एमपीएससी विद्यार्थ्यांची आंदोलन स्थळी जावून भेट घेतली होती. यावेळी पवारांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन लावून विद्यार्थ्यांची बाजू मांडली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांत बैठक घेऊ असे आश्वासन दिले होते.
बैठकीत ठरल्यानुसार पाच विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळात सोबत सह्याद्री अतिथीगृहावर उद्या संध्याकाळी पाच वाजता बैठक होणार आहे. उद्या होणाऱ्या बैठकीत तरी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागणीवर निर्णय होणार का ? असा प्रश्न आहे. राज्यसेवा परीक्षेचा नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करावा या मागणीसाठी पुण्यात तीन दिवसापासून विद्यार्थी आंदोलन करत आहेत.