MPSC Exam Result : एमपीएससीच्या निकालामुळे घोडेबाजाराची भीती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात आलेल्या एकापेक्षा जास्त पदभरतींमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पसंतीचे पद घेता येते.
MPSC Exam Result
MPSC Exam ResultSakal

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात आलेल्या एकापेक्षा जास्त पदभरतींमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पसंतीचे पद घेता येते. इतर पदे सोडण्याच्या पर्यायाला ‘ऑप्टींग आऊट’ असे म्हटले जाते. मात्र, असे करताना काही भावी अधिकारी चक्क पदांचा घोडेबाजार करतात.

यावर उपाय म्हणून अंतिम निवड यादीच्या आधी उमेदवाराने पसंतीक्रम देण्याचा नियम करण्यात आला होता. आता यालाच बगल देत एमपीएससीने धडाकेबाज निकाल लावले असून, हा घोडेबाजार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

एमपीएससीच्या परीक्षांचा अंतिम निकाल लावण्यापूर्वी काही नियमावली आखण्यात आली आहे. निकालाची प्रक्रिया देखील जाहिरातीत नमूद करण्यात आली आहे. मात्र याच नियमांना तिलांजली लावत निकालातील पसंतीक्रम हा घटक वगळून थेट शिफारपात्र उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामुळे हा एमपीएससीचा अंधाधुंदी कारभार असून मनमानी पध्दतीने काम केले जात असून उमेदवारांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे.

पोलिस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक - मुद्रांक निरीक्षक, राज्यकर निरीक्षक , सहायक कक्ष अधिकारी गट ब या पदांसाठी एमपीएससीकडून भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या पदांसाठीची गुणवत्ता यादी, पसंती क्रम, तात्पुरती निवड यादी ऑप्टींग आऊट आणि त्यानंतर अंतिम शिफारस यादी अशी निकाल लावण्याची प्रक्रिया पार पाडणे आवश्यक होते. मात्र असे न करता थेट निकाल लावण्यात आला आहे. त्यामुळे सुमारे तीनशे उमेदवारांची नोकरी मिळण्याची संधी हुकणार आहे. अशी खंत उमेदवारांनी सकाळशी बोलताना व्यक्त केली आहे.

ऑप्टींग आऊटचा काळाबाजार -

प्रतिक्षा यादीत असलेल्या उमेदवारांकडून त्याच्यापुढे असलेल्या उमेदवाराला ऑप्टींग आऊट वापरून पद सोडण्यासाठी किंवा पद सोडतो, असे सांगून पैसे देण्याची, घेण्याची प्रकरणे समोर आली होती. ऑप्टींग आऊटमुळे २०२१-२२ मध्ये काळा बाजार झाला होता. त्यामुळे असे प्रकार होऊ नयेत म्हणून यंदापासून पंसतीक्रम हा प्रर्याय नमूद करण्यात आला आहे.

त्यानुसार हा पर्याय या चारही पदांसाठी लागू होईल असे जाहिरातीत नमूद केले आहे. मात्र आता थेट शिफारस यादी लावण्यात आली आहे. त्यामुळे एमपीएससीनेच नियमाचे उल्लंघन केले आहे. असा आरोप उमेदवारांनी केला असून याचा उमेदवारांना मोठा फटका बसणार आहे, हे स्पष्ट झाले आहे.

या पदांची भरती प्रक्रिया..

  • राज्य कर निरीक्षक - १५९

  • दुय्यम निरीक्षक- मुद्रांक निरीक्षक - ४९

  • सहायक कक्ष अधिकारी - १६४

  • पोलिस उप निरीक्षक - ३७४

आचारसंहितेच्या तोंडावर मोठ्या प्रमाणावर पदभरतीचे निकाल घोषित करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, ऑप्टींग आऊटचा गैरफायदा घेण्याची भीतीही उमेदवार व्यक्त करत आहे.

- महेश घरबुडे, कार्याध्यक्ष, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती

पोलिस उपनिरीक्षक २०२४ च्या निकालासाठी आयोगाने नियमानुसार निश्चित केलेली प्रक्रियाच राबवावी. पसंतीक्रमाचा विचार करावा. नाहीतर ऑप्टींग आऊटचा काळाबाजार होण्याची शक्यता आहे. याविरोधात आम्ही न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहोत.

- आजम शेख, माहिती अधिकार कार्यकर्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com