Breaking ! "एमपीएससी'ची 14 मार्चपासून परीक्षा 

तात्या लांडगे 
Monday, 11 January 2021

ठळक बाबी... 

 • 14 मार्च रोजी राज्य सेवेची पूर्व परीक्षा 
 • महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 27 मार्च रोजी होणार  
 • महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्‍त पूर्व परीक्षा 11 एप्रिलला होणार 
 • राज्यातील आठशेहून अधिक परीक्षा केंद्रांवर होणार परीक्षा

  सोलापूर : कोरोना आणि मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे पुढे ढकलण्यात आलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्‍चित झाले आहे. त्यानुसार राज्य सेवेची पूर्व परीक्षा 14 मार्च रोजी होणार आहे. मराठा आरक्षणानुसार 'एसईबीसी' प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून संधी मिळणार आहे. तर आरक्षणानुसार आठ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना 'ईडब्ल्यूएस'संधी दिली जाणार आहे. 15 जानेवारीपर्यंत या विद्यार्थ्यांकडून सुधारित अर्ज भरुन घेतले जात आहेत. 

  राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने आयोगाने राज्य सरकारच्या आदेशानुसार परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आयोगाने दोनवेळा सुधारित वेळापत्रक जाहीर करुनही सर्वोच्च न्यायालयातून मराठा समाजाचे आरक्षण स्थगित झाल्याने पुन्हा आयोगाने परीक्षा थांबविली. आता डिसेंबरमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ निर्णयानुसार एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएसचा लाभ देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार आयोगाने आता परीक्षेचे वेळापत्रक निश्‍चित केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी न झाल्याने विद्यार्थ्यांची योग्य ती खबरदारी घेऊन ही परीक्षा होणार आहे. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रिनिंग केले जाणार असून राज्यातील आठशे परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा देताना मास्क बंधनकारक असून परीक्षेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा केंद्रांवर या विद्यार्थ्यांना उपस्थित राहावे लागणार आहे. 

  वयोमर्यादा संपलेल्यांनाही देता येईल परीक्षा? 
  यंदा कोरोना आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा झालीच नाही. त्यामुळे वयोमर्यादा संपुष्टात आलेल्या उमेदवारांसाठी ही शेवटची संधी असणार आहे. मात्र, विविध कारणांमुळे परीक्षेची एक संधी हुकल्याची भावना अनेक विद्यार्थ्यांच्या मनात आहे. त्यामुळे आणखी एक संधी द्यावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून होऊ लागली आहे. त्यामुळे या मागणीवर सरकारकडून काय निर्णय होईल, याची उत्सुकता लागली आहे. 

  संपादन : श्रीनिवास दुध्याल 


  स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
  Web Title: The MPSC exam will start from March 14