राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात अव्वल I MPSC Results | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prasad Chowgule

राज्य सेवा (पूर्व) परीक्षा 2019 रोजी 17 फेब्रुवारी 2019 ला मुंबईसह अन्य 37 केंद्रावर घेण्यात आली होती.

राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात अव्वल

कऱ्हाड (सातारा) : कोरोनामुळे दोन वर्षांपासून लांबलेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या Maharashtra Public Service Commission (MPSC) सन 2019 रोजी झालेल्या परीक्षेचा एससीबसीचे आरक्षण (SCBC Reservation) वगळून अंतिम निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत साताऱ्याच्या कऱ्हाड तालुक्यातील बनवडी गावच्या प्रसाद चौगुले (Prasad Chowgule) याने पुन्हा बाजी मारत राज्यात प्रथम क्रमांकावर मोहोर उमटवलीय.

राज्य सेवा (पूर्व) परीक्षा 2019 रोजी 17 फेब्रुवारी 2019 ला मुंबईसह अन्य 37 केंद्रावर घेण्यात आली होती. या परीक्षेच्या पूर्व परीक्षेकरता 3 लाख 60 हजार 990 उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. या परीक्षेतून 6 हजार 825 उमेदवार अर्हताप्राप्त ठरले होते. मुख्य परीक्षा 13 ते 15 जुलै 2019 रोजी मुंबई, औरंगाबाद, नागपूर आणि पुणे येथे घेण्यात आली होती. त्याचा निकाल जाहीर करण्यात आला. मुख्य परीक्षेसाठी 6 हजार 825 विद्यार्थी बसले होते. त्याचा एससीबीसी आरक्षण वगळून आज पुन्हा निकाल जाहीर झाला. त्यामध्येही प्रसाद चौगुले पुन्हा राज्यात प्रथम आला आहे.

हेही वाचा: MPSC : २०१९ चा अंतिम निकाल जाहीर; प्रथम क्रमांकावर 'या' विद्यार्थ्यांची बाजी

याबाबत बोलताना प्रसाद म्हणाला, माझ्या निर्णयाला पाठिंबा देणाऱ्या आई-वडील, तसेच स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्याचा मार्ग दाखवणारे भाऊजी यांच्यासह अनेकांनी केलेली मदत, मी घेतलेल्या मेहनतीचे चीज झाले. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील यशाचा आनंद खूप मोठा आहे. आई-वडील, भाऊजी प्रमोद चौगुले यांनी स्पर्धा परीक्षेचा दाखवलेला मार्ग व त्यासाठी करायला लावलेले नियोजन महत्वाचे ठरले. महाविद्यालयातील मित्रांसह सर्वांची मदत व माझ्या मेहनतीचे चीज झाल्याचे समाधान वाटते. प्रसादच्या यशाबद्दल त्याचे सहकार व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील, सरपंच परिषदेचे शंकरराव खापे यांच्यासह परिसरातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

हेही वाचा: कऱ्हाडच्या तुषारची IPS पदाला गवसणी; देशात पटकावली 224 वी रॅंक

loading image
go to top