राज्यपाल महोदय, ऑनलाईन परीक्षांचा हट्ट सोडा, विद्यार्थ्यांचा छळ थांबवा 

प्रमोद बोडके
Friday, 16 October 2020

विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन सक्षम आहे असे वाटत नाही. विद्यापीठाच्या या नियोजन शुन्य कारभाराचा व ढिसाळपणाचा जाहीर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस निषेध करत आहे. आता तरी या पुढील सर्व परीक्षा एकतर होम असाईनमेंट पध्दतीने व्हाव्यात किंवा परीक्षा पद्धतीतील सर्व अडचणी पूर्णपणे दूर करून मग त्या घेतल्या जाव्यात. यासंदर्भात आपण पुढाकार घेऊन महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांना आपण तसे आदेश द्यावेत व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना मानसिक त्रासातून मुक्त करावे. या पुढे ही परीक्षा अश्‍याच पध्दतीने सुरू राहिल्यास आम्ही सर्व विद्यापीठ व राजभवना समोर धरणे आंदोलन करु 
- सुनील गव्हाणे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस 

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात होणाऱ्या ऑनलाईन परीक्षांचा हट्ट सोडावा. या परीक्षांच्या माध्यमातझून विद्यार्थ्यांचा होणारा मानसिक छळ थांबवावा अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये ऑनलाईन परीक्षांबाबत येणाऱ्या अडचणींची माहिती असलेले निवेदन प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी राज्यपालांना दिले आहे. 

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने परीक्षेसाठी दिलेली लिंक ओपन होण्यासाठी वेळ लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी वेळ कमी मिळतो. प्रश्‍न पत्रिकेत अर्धेच प्रश्‍न दिसत होते तर अर्ध्या प्रश्‍नांचे फक्त पर्यायच दिसत होते. काही विद्यार्थ्यांची प्रश्‍न पत्रिका ऑटोमॅटिक सबमिट होत होती. विद्यापीठाने हेल्पलाईन म्हणून दिलेल्या नंबरवर एकदाही फोन घेण्यात आला नसल्याचे या पत्रात म्हटले आहे. अमरावतीमधील संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने सलग दुसऱ्यांदा अंतीम वर्षाच्या विद्यार्थांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. विद्यापीठ प्रशासनाकडून वारंवार परीक्षा प्रक्रिया निर्णयाच्या बाबतीत गोंधळ दिसून येतो. दीड लाख विद्यार्थांच्या परीक्षांसाठी फक्त हेल्पलाईन क्रमांक देण्यात आल्याचेही राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने म्हटले आहे. 

पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही असाच गोंधळ आहे. विद्यार्थ्यांना प्रश्‍न दिसणे, साईटवर फक्त एमसीक्‍यूच ेऑपशन येत होते. वेळोवेळी विद्यापीठाची साईट क्रॅश होते. वेबसाईटमध्ये अडचणी आल्यामुळे परीक्षा वेळेवर सुरू होत नाही. विद्यार्थ्यांना कित्येक तास ताटकळत रहावे लागते. परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे विद्यापीठाची हेल्पलाईन सतत व्यस्त लागत आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्याबाबतही अशाच तक्रारी आहेत. या विद्यापीठात लॉग इन करताना तांत्रिक अडचणी येत आहे. विद्यापीठाने दिलेल्या हेल्पलाईन नंबरद्वारे कुठल्याही प्रकारची मदत विद्यार्थ्यांना होत नाही. परीक्षेच्या वेळेवर पेपर ओपन न होता दोन चार तासांनी पेपर सुरु होत आहे. 

एमबीए शाखेच्या विद्यार्थ्यांचे वेगळ्याच विषयाचे पेपर ओपन होत आहेत. काही विद्यार्थ्यांचा परीक्षेचा वेळ निघुन गेला तरीही लॉग इन झाले नाही. 
नागपूर येथील राष्ट्र संत तुकडोजी महाराज विद्यापीठाने पेपर पीडीएफ पाठविताना वेळेचे योग्य नियोजन केलेले नाही. वेळापत्रकामध्ये नमूद केलेल्या वेळेत पेपर येत नाही. पेपर सबमिट करताना वेळेत सबमिट होत नाही. या संदर्भात तक्रार निवरणा करता संपर्क साधला असता उडवाउडवीची उत्तरे व अरेरावीची भाषा वापरली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mr. Governor, quit online exams, stop harassing students