esakal | Vidhan Sabha 2019 : युद्धात हरले; तहात जिंकतील
sakal

बोलून बातमी शोधा

Vidhan Sabha 2019 : युद्धात हरले; तहात जिंकतील

खरे तर शिवसेनेची अर्ध्या जागांवर लढण्याचीही तयारी नाही, पण तरीही समान जागांवर लढणार असा त्यांचा आग्रह आहे. तो मान्य करायचा नसता, तर युती तुटली  असती. आता ‘बाबापुता’ करणे सुरू आहे, याचाच अर्थ शिवसेनेला भाजपची गरज आहे, तशीच त्यांचीही आपल्याला आहे, असे भाजपला वाटत असावे. 

Vidhan Sabha 2019 : युद्धात हरले; तहात जिंकतील

sakal_logo
By
मृणालिनी नानिवडेकर

विधानसभा 2019
शिवसेना हा भावनेच्या बळावर चालणारा पक्ष. येथे प्रत्यक्षापेक्षा प्रतिमा उत्कट. ‘अयोध्येतील बाबरी मशीद माझ्या सैनिकांनी पाडली,’ असे घोषित करणारी बाळासाहेबांची शिवसेना गेल्या काही वर्षांत काहीसे उताराचे क्षण अनुभवत होती. पिढी बदलली होती. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व अमान्य करीत नारायण राणे आणि नंतर घरच्याच राजाने बंडाचा झेंडा उभा केला होता. बाळासाहेबांनी स्वत:चा राजकीय वारसदार म्हणून मुक्रर केलेल्या उद्धवजींचे राजकारण वेगळ्या बाजाचे होते. पदार्पणातच त्यांनी भीमशक्‍ती आणि शिवशक्‍तीचा नारा देत बेरजेचे राजकारण सुरू केले. जुना बाज न बदलता ते नव्या व्यवस्थेची मांडणी करू बघत होते. 

दुसरीकडे काळही झपाट्याने बदलत होता. महाजन- मुंडे यांच्या चटका लावणाऱ्या निधनानंतर भाजपमध्ये बदल झाले होते. नेमस्त वाजपेयी अन्‌ संघटक अडवानींची जागा नरेंद्र मोदी आणि अमित शहा या झंझावाताने घेतली. बघता बघता मोठा भाऊ असलेली शिवसेना लहान भावाच्या भूमिकेत गेली. भाजप सत्तेत येणार हे माहीत असल्याने गुळाकडे मुंगळे सरकत जावेत त्याप्रमाणे सर्वपक्षीय रीघ ‘कमळा’कडे लागली होती. अशा परिस्थितीत खरे तर सहकारी पक्ष संपून जायचे. पण उद्धव ठाकरे मात्र टिकून राहिले. २०१४ मध्ये स्वबळावर लढल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस नको म्हणून भाजपने वेगळ्या लढलेल्या शिवसेनेला आत घेतले अन्‌ शिवसेना एका अर्थाने मांडलिक झाली. दाता- याचक अशा भूमिकेत भाजप-शिवसेना गेले खरे, पण तरीही शिवसेना हवे ते मागत राहिली. भाजपतील नेमस्त मवाळ राजकारणामुळे शिवसेना ‘वांछिल ते ते लाभो’मुळे शिवसेनेला ‘अच्छे दिन’ आले काय माहीत नाही, पण उद्धवजी हवे ते मिळवत गेले. मुंबई महापालिकेत भाजप बरोबरीत पोचली, पण महापौरपद उदारहस्ते शिवसेनेला बहाल केले गेले. भाजप हा मार्ग नैतिक आचरणाचा अंगिकार करतो हे दाखवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे असावा असे वाटे. हिंदुत्ववादी विचारधारेवर श्रद्धा असलेल्या दोन्ही पक्षांनी एकत्र राहावे, मतपेटीचे विभाजन होऊ देऊ नये, पूर्वी ज्या शिवसेनेच्या खांद्यावर चढून महाराष्ट्र पाहिला, ते खांदे त्यागू नयेत अशा संमिश्र भावनांचे ते फलित असावे. 

शिवसेनेतील बहुतांश नेते भाजपगामी झालेले. पण मराठी माणसाचे राजकारण करणाऱ्या शिवसेनेला भाजपने दुखवण्याची आगळिक कधी केली नाही. लोकसभेत जहालमार्गी अमित शहांनीही ठाकरेंना सांभाळून घ्यायची भूमिका स्वीकारली अन्‌ ‘चौकीदार चोर है’ असे हिणवत उद्धव ठाकरे यांनी लोकसभेत एक अधिक जागा मिळवली. मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी दिल्ली विमानतळावर पोचलेल्या अनिल देसाईंना तसेच परतावे लागले, पण तरीही मोदी- शहा यांची वक्रदृष्टी शिवसेनेवर पडली नाही. उद्धव ठाकरे यांनी हे कसे साधले हा सर्वात महत्त्वाचा प्रश्‍न. 

शिवसेनेवर वक्रदृष्टी नाही
खरे तर सत्तेला प्राधान्य देणाऱ्या सरदारांमुळे शिवसेना पार अडचणीत आली होती. युती केली नाही तर खासदार बाहेर पडतील, भाजपमध्ये जातील अशी चर्चा होती, पण तसे झाले नाही. ‘महाराष्ट्रात प्रत्येक निवडणुकीत जागांचे अन्‌ सत्तेचे समसमान वाटप होईल,’ असे शहांनी स्वत: मुंबईत जाहीर केले. आता विधानसभेच्या निवडणुकीतही शिवसेना हाच समसमान वाटपाचा मुद्दा गोंजारत बसली आहे. ‘अफजलखानाची फौज’ही यावर दुमत व्यक्‍त न करता सहकाऱ्याला सांभाळून घेते आहे. फडणवीसांच्या नेतृत्वाखालील पक्षाला एकाचवेळी अनेक शत्रू नको असावेत. आधी दोन मोठ्या शक्‍तींनी एक व्हायचे अन्‌ मग हळूहळू स्वत:ची वेगळी ताकद दाखवायची हा मार्ग या दोन्ही पक्षांनी स्वीकारलेला दिसतो. 

खरे तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत नवागत फडणवीसांच्या नेतृत्वाने मोदीमोहिनीचा योग्य उपयोग करत एकट्याने लढलेल्या शिवसेनेला दुप्पट जागा जिंकत मागे टाकले. हा मर्यादित अर्थाने शिवसेनेचा पराभव होता. पण तरीही शिवसेना नंतर मांडीला मांडी लावून बसली. पुढे शिवसेनेचा प्राण असलेल्या मुंबईत पुन्हा एकदा शिवसेना जिंकूनही हरली. हे युद्ध तर शिवसेनेच्या ‘होमपीच’वरचे होते. ठाणे आणि कोकण वगळता कुठेही शिवसेना भाजपला वरचढ ठरली नाही. तरीही शिवसेनेला आपलेपणाने वागवण्याचे धोरण स्वीकारले गेले. 

टिकून असणे हेच शिवसेनेचे यश
आज खरे तर शिवसेनेची अर्ध्या जागांवर लढण्याचीही तयारी नाही, पण तरीही समसमान जागावाटपाच्या मुद्यावर शिवसेना अडून बसली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने कोणतीही भीडमुर्वत न बाळगता स्वबळावर लढण्याचे निश्‍चित केले. आदित्य ठाकरे यांच्या फॉर्म्युल्यामुळे १२१ च्या वर जागा दिल्या गेल्या नाहीत, असे म्हणतात. आताही आम्ही समान जागांवर लढणार असा शिवसेनेचा आग्रह आहे. तो मान्य करायचा नसता, तर युती एव्हाना तुटली असती. आता ‘बाबापुता’ करणे सुरू आहे, याचाच अर्थ शिवसेनेला जशी भाजपची गरज आहे, तशीच त्यांचीही आपल्याला आहे, असे भाजपला वाटत असावे. काळाच्या ओघात प्रादेशिक पक्ष मोठे होतात, नाहीतर संपतात. शिवसेना मात्र टिकून आहे. हे टिकून असणे हेच शिवसेनेचे यश आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला तहात जिंकवण्याचा मार्ग स्वीकारलेला दिसतो. खरे तर हातातील सर्व आयुधांचा वापर करीत भाजप आपल्याला विरोध करणाऱ्याला नेस्तनाबूत करते. शिवसेनेचे तसे झालेले नाही. आज उत्तम वातावरण असल्याने भाजपचे कार्यकर्ते स्वबळावर लढायला तयार आहेत. पण संपूर्ण राज्यात संघटनात्मक जाळे पसरले नसल्याने भाजप हा आग्रह मान्य करीत नसावा. विश्‍वासार्हता टिकून राहावी, सकारात्मक वातावरण झाकोळले जाऊ नये, हा त्यामागचा विचार खराच, पण नवागत आदित्यला मदतीला घेऊन उद्धव हे साधत आहेत हे विशेष.

loading image