प्रकाश महेता का 'उल्टा चष्मा' 

Prakash Mehta
Prakash Mehta

'अच्छे दिन'चे आश्‍वासन देणाऱ्या मोदींच्या पक्षाने एखाद्या नेत्याला पाठीशी घालावे की न्याय देण्यासाठी, कामे मार्गी लावण्यासाठी चेहरा बदलावा? गृहबांधणी क्षेत्रातील अनिष्ट मंडळींनी प्रकाश महेता यांच्या विरोधात कुभांड रचले असले, तर चौकशी होईपर्यंत त्यांनी पायउतार झालेले बरे! 

भारतीय जनता पक्षाला दुर्लभ बहुमत जनतेने दिले ते बदल घडावा यासाठी! भोळीभाबडी जनता पक्ष बदलला की जीवनात काहीशी सुधारणा होईल, अशी अपेक्षा आजही बाळगते. कॉंग्रेस राजवटीतील भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या मतदारांनी "न खाऊँगा, न खाने दूंगा' या नरेंद्र मोदी यांच्या घोषणेला मतपेटीतून भरभरून प्रतिसाद दिला. विधानसभेच्या निवडणुकीत देशाप्रमाणेच महाराष्ट्रात मतदान झाले. भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला, केवळ देशात-राज्यात नव्हे, तर मुंबईतही. आज या महानगरात भाजपचे सर्वाधिक आमदार आहेत.

नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या जवळपास बरोबरीने भाजपचे नगरसेवक निवडून आले आहेत. विस्तीर्ण वाढलेल्या या मुंबईत रोज शेकडो लोक नशीब काढायला दाखल होत असतात. गावात रोजगार मिळत नसल्याने वळकटी घेऊन इथे दाखल होणाऱ्यांची संख्या आजही मोठी आहे. मुंबई शहर हे संधींचे शहर आहे. इथे आलेल्या प्रत्येकाला मुंबई पोटाला लावते हे निश्‍चित आहे. अशा या शहरात इथल्या लक्षावधी कुटुंबांना घरे हवी असतात. किंबहुना या शहरातली सर्वांत मोठी समस्या आहे ती घरांची- आसऱ्याची. कसेही का असेना; पण रात्री शरीर टाकण्यासाठी एका आसऱ्याची गरज असते. भारतीय जनता पक्षाला हे माहीत आहे असे वाटते. मुंबई शहरात येत्या पाच वर्षात 11 लाख घरे बांधण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा या पार्श्‍वभूमीवर केली गेली असावी. त्यांच्या बहुतांश घोषणांप्रमाणेच हे स्वप्न उत्तमच आहे - होते. होते लिहिण्याचे कारण त्यांनी या कामगिरीसाठी निवडलेले गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांना या कामाऐवजी अन्य गोष्टीतच रस असल्याच्या हकिकती बाहेर येत आहेत. निवडणूक निकालांनी दिलेल्या धक्‍क्‍यातून सावरण्याचीही क्षमता नसलेल्या विरोधकांना पावसाळी अधिवेशनाच्या काळातच या प्रकरणांच्या सुरस आणि चमत्कारिक कहाण्या बाहेर येत आहेत. सरकारवर टीका करायला असा दारूगोळा मिळाल्याने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्राण आले आहेत. या प्रकरणांचे सत्य सांगा, अशी मागणी करत विधिमंडळातील दोन्ही सभागृहांचे काम बंद पाडले जाते आहे. 

प्रकाश महेता यांचे भारतीय जनता पक्षातील स्थान, पक्ष कुठेही नसताना त्यांनी दिलेले योगदान लक्षात घेता त्यांना पाठीशी घालण्याचे प्रयत्न होत आहेत. भाजपच्या मागे उभा राहणारा गुजराती समाज लक्षात घेता अवघा पक्ष विधिमंडळात विरोधकांना उत्तर देण्यासाठी सक्रियपणे "वेल'मध्ये उतरतो आहे, अशी दुर्दैवी चर्चा सुरू आहे. हे सगळे कुठवर चालवले जाणार हा खरा प्रश्‍न आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर सत्ता राबवण्याची भाजपची इच्छा लपून राहिलेली नाही. अशा परिस्थितीत गृहनिर्माण हे महत्त्वाचे खाते कसे चालवायचे, याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. जागा हा आजच्या परिस्थितीतला सर्वांत महत्त्वाचा मुद्दा. "समृद्धी'सारख्या प्रकल्पासाठी, तो मार्गी लावण्यासाठी आरोप, चर्चांचा विचार न करता कामे मार्गी लावणाऱ्या राधेश्‍याम मोपलवारांना निवडले गेले असावे. त्यांच्याशी संबंधित आरोपांची चर्चा सुरू होताच फडणवीस यांनी त्यांना बाजूला केले. आता त्यांच्यावरचे आरोप जुन्या राजवटीतले आहेत, असे सांगत स्वच्छ प्रतिमेचे मुख्यमंत्री फडणवीस त्यांना वाचवत का आहेत, असा प्रश्‍न आहेच. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे प्रकाश महेता यांचे काय केले जाणार आहे? प्रारंभापासूनच महेता यांची कार्यशैली वादग्रस्त ठरली. त्यांचा चष्मा उलटा आहे. गृहनिर्माण धोरण त्यांच्या हस्तक्षेपामुळे अचानक मागे घ्यावे लागले. सकाळ माध्यम समूहातील साम वाहिनीच्या प्रतिनिधीला त्यांनी केलेली दमदाटी राजकारणातील बेदरकारीचे प्रदर्शन करणारी होती. त्यावर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली; पण तीही मुख्यमंत्र्यांच्या निरोपामुळे. चुका होतात, पण त्यातून बाहेर पडताना काही शिकायचे असते. महेता यांनी मात्र अजूनही बोध घेतलेला दिसत नाही.

उपनगरातील "टीडीआर' अन्यत्र मुंबई महानगरात वापरण्याचे प्रकरण असो किंवा एका विकसकाला दिलेला भूखंड त्याने तसाच ठेवल्याने "म्हाडा'ने हस्तगत केल्यानंतरही पुन्हा त्यालाच देण्याचे प्रकरण असो. आता तर मुंबईकरांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या "एसआरए' प्रकल्पात भाडेकरूंना बाजूला ठेवून त्यांनी मुलाला, खोट्या नावाने पत्नीला घर दिल्याचे आरोप होत आहेत, ते कमालीचे गंभीर आहेत. मुंबईतील 60 टक्के जनता झोपडीत राहते. चाळी विदीर्ण आहेत. मध्यमवर्गीयांना घरे नाहीत, भाडेकऱ्यांचे प्रश्‍न बिकट आहेत. अशा परिस्थितीत "अच्छे दिन'चे आश्‍वासन देणाऱ्या मोदींच्या पक्षाने एखाद्या नेत्याला पाठीशी घालावे की न्याय देण्यासाठी-कामे मार्गी लावण्यासाठी चेहरा बदलावा? गृहबांधणी क्षेत्रातील अनिष्ट मंडळींनी त्यांच्या विरोधात कुभांड रचलेच असले, तर चौकशी होईपर्यंत पायउतार झालेले बरे! मेहता ही एक राजकीय संस्कृती झाली आहे, हे लक्षात घेत मोपलवारांप्रमाणेच फडणवीस त्यांनाही दूर करतील काय?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com