महावितरणचा निर्णय; तक्रारींसाठी आता व्हॉटसपचे व्यासपीठ 

संतोष सिरसट 
Monday, 6 July 2020

या नंबरवर तक्रार करा व्हॉटसप 
सोलापूर जिल्ह्यासाठी 7875440455 हा व्हॉटस्‌ ऍप मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर फक्त वीज वितरण यंत्रणेपासून सुरक्षेचा धोका असल्याच्याच फोटोसह माहिती / तक्रारी स्वीकारण्यात येणार आहेत. या मोबाईल क्रमांकावर नागरिकांनी कॉल करू नये. फक्त व्हॉटस्‌ ऍपद्वारे माहिती द्यावी, असे महावितरणकडून स्पष्ट केले आहे. ज्या नागरिकांकडे व्हॉटस्‌ ऍप नाहीत, त्यांनी "एसएमएस'द्वारे या मोबाईल क्रमांकावर माहिती दिल्यास त्याचेही निराकरण करण्यात येणार आहे. 

सोलापूर ः जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील वीजतारा तुटणे, झोळ पडणे किंवा जमीनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे अशा वीजसुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या यंत्रणेची माहिती देण्यासाठी किंवा तक्रार करण्यासाठी महावितरणने नागरिकांना मोबाईलद्वारे व्हॉटस्‌ ऍपचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. 

महावितरणचे पुणे प्रादेशिकचे प्रभारी संचालक अंकुश नाळे यांनी याबाबत परिपत्रक काढले आहे. व्हॉटस्‌ ऍपद्वारे प्राप्त झालेल्या फोटो, माहिती तक्रारींनुसार वीजयंत्रणेची ताबडतोब दुरुस्ती करण्यात यावी तसेच संबंधीत तक्रारकर्त्यांना कळविण्यात यावे असे निर्देश त्यांनी दिले आहेत. 

महावितरणची वीजतार तुटलेली आहे, झोळ किंवा जमीनीवर लोंबळकत आहे. फ्यूज पेट्या किंवा फिडर पिलरचे झाकणे उघडी किंवा तुटलेले आहे तसेच रोहित्रांचे कुंपण उघडे आहे. खोदाईमुळे भूमिगत वाहिनी उघड्यावर आहे अशाच स्वरुपाची माहिती / तक्रारी छायाचित्रांसोबत संबंधीत स्थळाच्या संपूर्ण पत्त्याचा उल्लेख करून व शक्‍य असल्यास स्थळाच्या लोकेशनसह नागरिकांना व्हॉटस्‌ ऍपच्या मोबाईल क्रमांकावर पाठवता येणार आहे. यासोबतच अशा स्वरुपाच्या तक्रारींसाठी महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर देखील सध्या सुरु असलेली सेवा उपलब्ध राहील. 

व्हॉटस्‌ ऍपद्वारे महावितरणच्या मोबाईल क्रमांकावर आलेली फोटोसह माहिती किंवा तक्रार लगेचच संबंधीत विभागीय व उपविभागीय कार्यालयात पाठविण्यात येणार आहे. तक्रारीनुसार वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे काम झाल्यानंतर संबंधीत तक्रारकर्त्यांना व्हॉटस्‌ ऍपद्वारेच दुरुस्तीनंतरचे छायाचित्र पाठवून कळविण्यात येणार आहे. नागरिकांनी पाठविलेल्या काही तक्रारींचे निवारण करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयांची मंजुरी, निधी किंवा शिफ्टींगची गरज असल्यास तसे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येतील व त्याबाबत संबंधीत तक्रारकर्त्यांना कळविण्यात येणार आहे. महावितरणच्या या उपक्रमाला नागरिकांनी प्रतिसाद देऊन वीजसुरक्षेसाठी वीज वितरण यंत्रणेतील धोके कमी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEDCL decision; WhatsApp's platform for complaints now