महावितरण म्हणते; इंधन समायोजन धरून वीज दरवाढ नाही 

संतोष सिरसट 
Tuesday, 7 July 2020

सोलापूर ः महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील वीजदरामध्ये इंधन समायोजन आकार धरून सरासरी दरवाढ झालेली नाही, असे स्पष्टीकरण महावितरणने दिले आहे. 

सोलापूर ः महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील वीजदरामध्ये इंधन समायोजन आकार धरून सरासरी दरवाढ झालेली नाही, असे स्पष्टीकरण महावितरणने दिले आहे. 

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने 30 मार्चला चौथ्या नियंत्रण कालावधीसाठी संपूर्ण नियामक प्रक्रियेचा अवलंब करून बहुवर्षीय वीजदर आदेश दिले आहेत. हे वीजदर एक एप्रिलपासून लागू झाले आहेत. घरगुती वर्गवारीतील ग्राहकांसाठीच्या सरासरी वीजदरात सुमारे पाच टक्‍क्‍यांची घट केली आहे. त्यामुळे वीजदरांमध्ये 50 पैसे ते एक रुपया इतकी वाढ झाली असे म्हणणे संयुक्तिक नाही. वीजखरेदी खर्चामधील सध्या लागू असलेल्या वीजदर विनियमातील तरतुदीनुसार आयोगाने मान्य केलेल्या वीज खरेदीच्या खर्चापेक्षा जास्त खर्च झाल्यास त्याच्या वसुलीसाठी इंधन समायोजन आकार आकारण्यात येतो. त्यामुळे इंधन समायोजन आकार हा वीजदराचा अविभाज्य भाग आहे आणि म्हणूनच ग्राहकांच्या वीजदरांची तुलना करताना इंधन समायोजन आकाराचा त्यामध्ये समावेश करणे आवश्‍यक आहे. वीजखरेदी खर्चामधील होणारी अपेक्षित वाढ लक्षात घेऊन आयोगाने इंधन समायोजन आकार या घटकाचा समावेश वीजदरात केला आहे. 
फेब्रुवारीत लागलेला इंधन समायोजन आकार विचारात घेऊन नवीन बहुवर्षीय वीजदर आदेशामध्ये मंजूर केलेल्या वीजदरांची तुलना केल्यास जवळपास सर्व वर्गवारींच्या वीजदरात घट झालेली आहे. या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या काही महिन्यांचा इंधन समायोजन आकार हा उणे येणे अपेक्षित असल्याने आयोगाने इंधन समायोजन आकारातील संभाव्य फरक लक्षात घेऊन महावितरणला इंधन समायोजन आकार स्थिरीकरण निधीपोटी फक्त 1500 कोटी रुपये मर्यादेपर्यंत रक्कम मान्य करून दिली. जर भविष्यकाळात वीज खरेदी खर्चात अनपेक्षीत वाढ झाल्यास या रकमेचा वापर इंधन समायोजन आकाराकरिता करता येईल आणि सदर रक्कम संपुष्टात येईपर्यंत ग्राहकांना इंधन समायोजन आकार लावण्यात येणार नाही. त्यामुळे ग्राहकांच्या वीजदरात स्थिरता येईल. विशेष म्हणजे जरी स्थिर आकारांमध्ये ग्रामीण भागासाठी 10 रुपये प्रति महिना आणि शहरी भागासाठी 20 रुपये प्रति महिना इतकी किरकोळ वाढ झाली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEDCL says; No increase in electricity tariff including fuel adjustment