#AareyForest 'आरे'त वृक्षतोड करणाऱ्यांना 'पीओके'त पाठवा : आदित्य ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 October 2019

आरेमधील जैवविविधता संपवण्याचा हा घाट लज्जास्पद आहे. अधिकारी ज्या तत्परतेने आरे कॉलनीतील वृक्ष तोडत आहेत ते पाहता त्यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठवायला हवे. झाडांची कत्तल करण्यापेक्षा पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ  उद्ध्वस्त करण्याचे काम त्यांच्याकडे सोपवायला हवे.

मुंबई : आरेमधील वृक्षतोडीला सुरवातीपासून विरोध करणारे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आरेमधील वृक्षतोडीला विरोध केला आहे. तसेच त्यांनी वृक्षतोड करणाऱ्यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करायला पाठवायला हवे असे म्हटले आहे.

आरेमधील प्रस्तावित मेट्रो कारशेडविरोधात पर्यावरणप्रेमींनी दाखल केलेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे शुक्रवारपासून आरेमधील वृक्षतोडीला सुरवात झाली आहे. 200 हून अधिक झाडे तोडण्यात आली असून, पर्यावरण प्रेमींकडून विरोध दर्शविण्यात येत आहे. तसेच शिवसेनेच्या नेत्यांनी याठिकाणी आंदोलनही केले. AareyForest हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेडींगमध्ये आहे.

आदित्य ठाकरे यांनीही वृक्षतोडीला विरोध करत म्हटले आहे, की आरेमधील जैवविविधता संपवण्याचा हा घाट लज्जास्पद आहे. अधिकारी ज्या तत्परतेने आरे कॉलनीतील वृक्ष तोडत आहेत ते पाहता त्यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठवायला हवे. झाडांची कत्तल करण्यापेक्षा पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ  उद्ध्वस्त करण्याचे काम त्यांच्याकडे सोपवायला हवे. आरे कारशेड परिसरातील अनेक पर्यावरणवादी तसेच स्थानिक शिवसैनिकांनी वृक्षतोडीचा हा डाव हाणून पाडण्याचा प्रयत्न केला मात्र तेथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. ज्यापद्धतीने आपण मुंबई मेट्रो तीनसाठी जंगल नष्ट करत आहोत ते पाहता हा प्रकल्प भारताने संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण परिषदेत मांडलेले सर्व दावे खोडून टाकताना दिसत आहे. पर्यावरणसंदर्भातील समस्या, प्लॅस्टिकमुळे होणारे प्रदुषण यासारख्या गोष्टींवर केंद्र सरकारने बोलण्यात काहीच अर्थ नाही. मुंबई मेट्रो 3 प्रकल्पामुळे आरेच्या वनक्षेत्राचे नुकसान होत आहे. ही लढाई अहंकाराची लढाई असल्यासारखे काम मेट्रोकडून केले जात असल्याने या मेट्रोचा मूळ उद्देशच संपला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Aarey Forest Yuvesena chief Aditya Thackeray tweet about tree cutting