Uddhav Thackeray: ''मध्यावधी लागणारच, इतक्या दिवसांमध्ये एवढं लक्षात येतंच की'' ठाकरेंनी पुन्हा स्पष्ट केलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray vs Eknath Shinde

Uddhav Thackeray: ''मध्यावधी लागणारच, इतक्या दिवसांमध्ये एवढं लक्षात येतंच की'' ठाकरेंनी पुन्हा स्पष्ट केलं

मुंबई : राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता असल्याचं भाकीत शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी काल केलं होतं. शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले होते. आज एका कार्यक्रमात पुन्हा त्यांनी 'मध्यावधी'बद्दल भाष्य केलंय.

(Chance of mid term elections in Maharashtra Prediction of Uddhav Thackeray)

अमृत यात्रा पुस्तक प्रकाशन कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे बोलत होते. त्यांनी त्यांच्या कालच्या विधानाची आठवण करुन देत सांगितलं की, मी इतक्या दिवसांपासून राजकारणात असल्याने एवढं तर नक्कीच कळतं. मध्यावधी होणार, हे माझं राजकीय अनुमान आहे, असं ते म्हणाले. त्यामुळे उद्धव ठाकरे 'मध्यावधी'बाबत ठाम असलल्याचं दिसून येतय.

शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे काल याबाबत स्पष्ट बोलल्या होत्या. ''शिवसेनेची पहिल्यापासूनची बांधणी अशी आहे की, मुंबईतले जे पदाधिकारी असतात त्यांना जे पक्षाचे महत्वाचे निरोप असतात ते संपर्क प्रमुखांना पाठवले जातात. त्यानुसार आजची बैठक झाली. पंतप्रधानांनी महाराष्ट्रासाठी काही खास पॅकेज जाहीर केले आहेत. यामुळं महाराष्ट्रात मध्यावती निवडणूक जाहीर होण्याची शक्यता उद्धव ठाकरेंनी वर्तवली आहे. कायमचं महाराष्ट्र-गुजरात असा वाद निर्माण करुन भाजपकडून मतांचं राजकारण केलं जात आहे'' असं कायंदे यांनी बैठकीनंतर सांगितलं होतं.

आज उद्धव ठाकरे यांनी याला दुजोरा देत मध्यावधी होतील, असं सांगितलं आहे. त्यामागे नेमकं राजकारण काय आणि सध्या पडद्यामागे नेमकं घडतंय काय, याबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता नाही. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व आमदारांसह गुवाहटीला जाणार असल्याचं वृत्त आहे. पुढच्या आठवड्यामध्ये ते कामाख्या देवीच्या दर्शनाला जातील, असं सांगितलं जातंय. याबाबत अधिकृत माहिती नसली तरी काहीतरी शिजतंय, एवढं मात्र नक्की.