औषधांच्या किमती वाढविण्यासाठी कंपन्यांचा केंद्र सरकारवर दबाव | Mumbai | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

medicine
औषधांच्या किमती वाढविण्यासाठी कंपन्यांचा केंद्र सरकारवर दबाव

मुंबई : औषधांच्या किमती वाढविण्यासाठी कंपन्यांचा केंद्र सरकारवर दबाव

मुंबई : औषध निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची किंमत वाढल्याने औषधांच्या किमतीही २० टक्क्यांनी वाढवण्याची मागणी औषधनिर्मिती कंपन्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. त्यामुळे आता महागाईच्या भडक्यात औषधांचेही इंधन पडण्याची भीती आहे. एक हजारपेक्षा जास्त औषधनिर्मिती कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गटाने सरकारकडे ही मागणी केली आहे. डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शनशिवाय देता येत नाहीत अशा नॉन शेड्यूल्ड औषधांच्या किमती दरवर्षी जास्तीत जास्त १० टक्केच वाढवता येतात; मात्र औषधनिर्मिती प्रक्रियेत लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने औषधांच्या किमती त्याहून अधिक वाढवणे अपरिहार्य आहे, असे कंपन्यांचे म्हणणे आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय, नीती आयोग, औषधनिर्मिती खात्याचे सचिव तसेच नॅशनल फार्मास्युटिकल प्राइजिंग ॲथॉरिटी व इंडियन ड्रग्ज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन यांच्याकडे औषध कंपन्यांनी मागणीचे निवेदन दिले आहे. सार्वत्रिक दरवाढीमुळे कच्चा माल, पॅकिंगचे साहित्य तसेच वाहतूक खर्चही वाढला आहे. या असाधारण स्थितीत आम्हाला एकदाच तात्काळ दिलासा द्यावा, अशी मागणी कंपन्यांनी केली आहे. नेहमीच्या १० टक्के वाढीबरोबरच जादा १० टक्के वाढ करण्याची संमती द्यावी. त्यासाठी ड्रग प्राईज कंट्रोल ऑर्डरमधील परिच्छेद १९ मधील अधिकार वापरावेत, अशी मागणी कंपन्यांनी केली आहे.

कच्च्या मालाच्या किमती कमी झाल्यानंतर ही १० टक्के जादा वाढ मागे घेतली जाऊ शकेल, असेही कंपन्यांनी म्हटले आहे. याशिवाय शेड्यूल्ड औषधांच्या किमतीही (डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शनशिवाय घेता येणारी औषधे) १० टक्के वाढवण्याची मागणी कंपन्यांनी केली आहे. निदान ज्या शेड्यूल्ड औषधांच्या किमती मर्यादेपेक्षा कमी आहेत, त्यांच्या किमती वाढवाव्यात, अशी मागणी कंपन्यांनी केली आहे.

तर औषधांची टंचाई! पॅरासिटेमॉलच्या किमती या वर्षी १३० टक्क्यांनी वाढल्या आहेत. सिरप, ड्रॉप्स यांच्यात वापरले जाणारे ग्लिसरीन व प्रॉपिलीन ग्लायकोल यांच्या किमतीही ८३ ते २६३ टक्के वाढल्या आहेत. कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने औषध निर्मितीत अडचणी येत असल्याने रुग्णालयांनादेखील औषधांची टंचाई भासू शकते, असे इंडियन ड्रग मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने म्हटले आहे.

loading image
go to top