एक घास... गरिबाला

Roti-Bank
Roti-Bank

मुंबई - ठाणे, पालघर जिल्ह्यांतील मिळून गेल्या १० महिन्यांत तब्बल ६१३ जणांचा भूकबळी गेला. डहाणू, जव्हार, मोखाडा आणि शहापूरसारख्या आदिवासी तालुक्‍यांत अद्याप कुपोषणाचा प्रश्‍न गंभीर असताना नजीकच्या मुंबईत मात्र शिल्लक राहिलेले अन्न फेकण्याचा प्रकार सर्रास दिसतो. उपाहारगृहे, कॅफे, मोठमोठ्या मॉलमधून दिवसाला कित्येक किलो अन्न वाया जात असल्याचे भयाण चित्र आहे. लग्न-सोहळ्यात तर अन्नाची नासाडी ठरलेलीच. असे वाया जाणारे अन्न गरजूंच्या थाळीत वाढून माणुसकीचा नवा आदर्श निर्माण केला आहे तो मुंबईतील डबेवाल्यांनी. त्यांची ‘रोटी बॅंक’ दीनदुबळ्यांसाठी अन्नदाता ठरत आहे. 

रुग्णांच्या नातेवाइकांना आधार
कार्यालयीन कामकाजात अडकलेल्या मुंबईकराला घरच्या जेवणाचे डबे वेळेवर पोचवणारे मुंबईतील डबेवाले प्रसिद्ध आहेत. डबेवाल्यांचे सचिव गंगाधर टिळेकर यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त वाया जाणारे अन्न गरिबांना वाटण्याचा निर्धार डबेवाल्यांनी केला. त्यातूनच २९ डिसेंबर २०१५ रोजी ‘रोटी बॅंक’ सुरू झाली. रात्री सायकलीने फिरून उपाहारगृहे आणि खानावळींतून जमा केलेले अन्न डबेवाले गरिबांच्या वस्तीत पोचवतात.

परळमधील केईएम रुग्णालय, वाडिया रुग्णालय आणि टाटा कॅन्सर रुग्णालयाचा परिसर रुग्णांच्या नातेवाइकांनी गजबजलेला असतो. रुग्णाला रुग्णालयाकडून जेवण मिळते; मात्र त्यांच्यासोबतच्या नातेवाइकांची भूक ‘रोटी बॅंक’मुळे भागते. शिल्लक राहिलेले अन्न दक्षिण मुंबईतील काही वस्त्यांमध्येही पोचवले जाते. 

अन्नाची वाढती मागणी लक्षात घेत डबेवाल्यांच्या असोसिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी स्वतःच गाडी खरेदी केली. सायंकाळी ते या वाहनांतूनच ‘रोटी बॅंक’साठी अन्न गोळा करतात. डबेवाल्यांच्या या कार्याची दखल घेत माजी पोलिस अधिकारी डी. शिवानंदन यांनी दोन वाहने दिली; मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे थोड्या अडचणी येत आहेत. ‘अन्न गरिबांसाठी घेऊन जा’, असे सांगणारे दिवसाला २५ फोन येतात; मात्र इतक्‍या लोकापर्यंत पोचता येत नाही, अशी खंत तळेकर यांनी व्यक्त केली.

‘अन्न वाचवा समिती’ 
औरंगाबाद ः अनंत मोताळे यांच्या पुढाकारातून तीन-चार वर्षांपासून ‘अन्न वाचवा’ समितीचे कार्य सुरू आहे. लग्न-समारंभ, वाढदिवस आणि महाप्रसादांच्या कार्यक्रमांमधून उरलेले अन्न जमा करून सरकारी दवाखान्यांचा परिसर, बस स्थानक, रेल्वे स्थानक, उड्डाण पुलांच्या खाली बसणारे निराधार यांना वाटले जाते. लग्नसराईतील अक्षतांचे प्रमाण कमी करून वाचलेला तांदूळ गरिबांना वाटण्याचा उपक्रमही समितीने राबवला. 

‘भिक्षान्‌ देही’ अभियान 
मराठवाड्याला सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागतो. यंदा दुष्काळाची दाहकता अत्यंत तीव्र आहे. दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि गरजूंना धान्यरूपाने मदतीचा हात देण्याकरिता ‘अन्न वाचवा’ समितीकडून ‘भिक्षान्‌ देही अभियान’ राबवण्यात येणार आहे. या अभियानात १० टन धान्य संकलन करण्याचे उद्दिष्ट आहे. बिकट परिस्थिती असणाऱ्या गावांतील गरजूंना हे धान्यवाटप केले जाणार आहे. 

‘इनरव्हील’चे अन्नपूर्णा फ्रीज 
‘इनरव्हील क्‍लब ऑफ औरंगाबाद लोटस’च्या वतीने ‘अन्नपूर्णा फ्रीज’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. घरे, हॉटेलांमध्ये उरलेले अन्न फेकून न देता ते व्यवस्थित पॅक करून फ्रीजमध्ये ठेवावे आणि गरजूंनी ते घेऊन जावे, अशी ही संकल्पना आहे. इनरव्हीलचे अध्यक्ष निकीत अग्रवाल यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू झाला. बाहेरून आणलेले अन्न तपासणी करूनच स्वीकारले जाते, असे सांगण्यात आले.

तीन वर्षांपासून हा उपक्रम अविरत सुरू आहे. अनेक अडचणींवर मात करून ‘रोटी बॅंक’ सुरू आहे. मदतीचे हात वाढले की प्रत्येक गरजूपर्यंत पोचता येईल. 
- सुभाष तळेकर, प्रवक्ते डबेवाला असोसिएशन, मुंबई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com