राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मते फुटण्याची शक्‍यता?

मृणालिनी नानिवडेकर
शनिवार, 10 जून 2017

मुंबई - राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने या वेळी आपल्या समवेत रहावे, अशी भाजपची इच्छा आहे, मात्र ती पूर्ण न झाल्यास शिवसेनेतील बहुबोल नेत्यांना वाढलेली मते काय ते सांगतील, असे भाजप गोटात बोलले जाते आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील सरकारचे छुपे समर्थकही या निवडणुकीत सरकारला अतिरिक्‍त मतांची कुमक देऊ शकतील, असे सांगितले जाते आहे.

मुंबई - राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने या वेळी आपल्या समवेत रहावे, अशी भाजपची इच्छा आहे, मात्र ती पूर्ण न झाल्यास शिवसेनेतील बहुबोल नेत्यांना वाढलेली मते काय ते सांगतील, असे भाजप गोटात बोलले जाते आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील सरकारचे छुपे समर्थकही या निवडणुकीत सरकारला अतिरिक्‍त मतांची कुमक देऊ शकतील, असे सांगितले जाते आहे.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी कुणाचे नाव पुढे येणार, हा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या अखत्यारीतीतला असल्याने त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. राष्ट्रपती सर्वसंमतीने निवडला जावा, अशीही भावना आहे. मात्र, केंद्र याबद्दलचा निर्णय घेईल, असे भाजपच्या एका महत्त्वाच्या नेत्याने स्पष्ट केले. शिवसेनेने गेल्या दोन निवडणुकींप्रमाणे या वेळी भाजपने पुढे केलेल्या उमेदवाराला विरोध करू नये, अशी अपेक्षा आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर भाजपने मोठे यश मिळवल्यानंतरही शिवसेनेचा महापौर मान्य केला. शिवसेनेला सांभाळून घेण्याचे धोरण भाजपने कायम ठेवले असताना काही नेते करत असलेली भडक विधाने भाजपच्या संतापाचा विषय झाली आहेत.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणूक सूत्रानुसार आज भारतीय जनता पक्षाला विरोधकांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला तर काही टक्‍के मतांची गरज असेल. शिवसेनेने अशा वेळी वेगळा निर्णय घेतला तर तो मैत्रीच्या आचारसंहितेचा भंग असेल. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यासंदर्भात कोणतीही आगळीक करणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. ते नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या बैठकीला हजर राहिले होते.

तरीही वेगळा निर्णय झाल्यास भाजपने शक्‍तिप्रदर्शन करावे, असा एका गटाचा आग्रह आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत पक्षादेश पाळणे बंधनकारक नसल्याने काही वेगळे घडणे सहजशक्‍य आहे, असे बोलले जाते आहे. त्यातच देवेंद्र फडणवीस सरकारला छुपा पाठिंबा देणाऱ्या समर्थकांना त्यांची बाजू दाखवण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी संपाच्या वातावरणात कोणतीही भूमिका न घेता राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची वाट पहावी, असे भाजपतील एका गटाचे मत आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या दौऱ्यात याविषयावर चर्चा होण्याची शक्‍यता असल्याचेही सांगण्यात येते आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai maharashtra news According to the presidential elections, the possibility of breaking?