मुंबई - 'बंदिनी', "परमवीर', "हॅलो इन्स्पेक्टर' यांसारख्या लोकप्रिय मालिकांचे दिग्दर्शक गौतम अधिकारी (वय 67) यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी, जावई, सून आणि दोन भाऊ असा परिवार आहे.
गौतम अधिकारी हे "अधिकारी ब्रदर्स' संस्थेचे सहसंचालक होते. त्यांनी "बंदिनी', "परमवीर', "हॅलो इन्स्पेक्टर', "धनंजय' व "संघर्ष' आदी मराठी मालिकांचे; तसेच "सुराग', "पॅंथर', "वक्त की रफ्तार', "कुंती' या हिंदी मालिकांचे दिग्दर्शन केले. या मालिकांतून त्यांनी नवोदित कलाकारांना संधी दिली. "भूकंप' व "चेहरा' या हिंदी चित्रपटांचेही दिग्दर्शन त्यांनी केले होते. मालिकांच्या सर्वाधिक भागांचे दिग्दर्शन करण्याचा विक्रम अधिकारी यांनी केला. त्या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही करण्यात आली होती.
गौतम अधिकारी यांची शोकसभा विलेपार्ले येथील जलाराम बाप्पा सभागृहात सोमवारी (ता. 30) संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत होणार आहे.
|