राज्यातील पहिले सोलर पार्क धुळ्यात

निखिल सूर्यवंशी
मंगळवार, 27 मार्च 2018

धुळे - राज्यातील तूट भरून काढण्यासाठी दोंडाईचा-विखरण परिसरात सौरऊर्जेवर आधारित 500 मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्प प्रस्तावित आहे. पैकी पहिल्या टप्प्यात 250 मेगावॉट सौर वीजनिर्मिती प्रकल्पाला म्हणजेच सोलर पार्कला सरकारने मान्यता दिली आहे. त्या अनुषंगाने "महाजनको'ने नियोजन सुरू केले आहे. यात जे शेतकरी किंवा इतरांना जमिनी द्यायच्या नाहीत, त्यांना वगळून या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचे "महाजनको' स्तरावर विचाराधीन आहे.

"औष्णिक'ऐवजी आता सोलर पार्क
दोन हजार कोटींच्या गुंतवणुकीतून शिवाजीनगर (ता. साक्री) येथे सुरू झालेल्या दीडशे मेगावॉटच्या सोलर सिटी प्रकल्पानंतर दोंडाईचा-विखरण परिसरात दुसरा आणि वाढीव क्षमतेचा सोलर पार्क प्रकल्प प्रस्तावित आहे. यात 138 शेतकरी आणि सरकारमधील भूसंपादनाच्या मोबदल्याप्रश्‍नी वाटाघाटी फिसकटल्याने या क्षेत्रात 2009 पासून प्रस्तावित 3300 मेगावॉट औष्णिक वीजनिर्मितीचा प्रकल्प गेल्या वर्षी रद्द झाला. त्याऐवजी सुमारे साडेतीन हजार कोटींच्या गुंतवणुकीतील सोलर पार्क प्रकल्प उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला. पैकी पहिल्या टप्प्यात अडीचशे मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्पाला मान्यता दिली आहे. त्याची महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी (महाजनको) अंमलबजावणी करेल.

14 कोटी जमा; सानुग्रह अनुदानही देणार
"महाजनको'ने प्रथम वाटाघाटी करत विखरण, मेथी परिसरातील 476 हेक्‍टर जमीन खरेदी केली. त्यात कुठलाही वाद शिल्लक नाही. उर्वरित दोनशे हेक्‍टरमधील 138 शेतकऱ्यांनी समाधानकारक मोबदला मिळत नसल्याची तक्रार करत जमीन देण्यास विरोध केला. त्यामुळे सरकारने कलम सहाप्रमाणे दोनशे हेक्‍टर क्षेत्र अधिग्रहीत केले. त्याचा नियमानुसार 2015 ला निवाडा जाहीर केला. त्यासाठी "महाजनको'ने 14 कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाकडे जमा केला. ही मोबदल्याची रक्कम आणि त्यात 138 शेतकऱ्यांना वाढीव दराच्या मागणीनुसार व्याजासह सानुग्रह अनुदान देऊन दोनशे हेक्‍टर क्षेत्र ताब्यात घेण्याचा "महाजनको'चा प्रयत्न सुरू आहे. त्यावर निर्णय आणि निर्धारित मोबदला वाटपानंतरच सोलर पार्क प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू होऊ शकेल.

दोंडाईचा-विखरणलाच प्रकल्प का?
धुळे जिल्ह्यात पावसाचे सरासरी 40 दिवस वगळता 365 पैकी सरासरी 325 दिवस सौर "रेडिएशन' मिळते. त्याबाबत हा जिल्हा भाग्यवान आहे. त्यासह शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौरऊर्जा वाहिनी योजनेच्या लाभातून सोलर पार्क प्रकल्प उभारण्याचा निर्णय झाला; मात्र मोबदल्याप्रश्‍नी तीन वर्षांत सकारात्मक निर्णय होऊ न शकल्याने वीजनिर्मिती प्रकल्पाचे काम रखडले आहे. एक मेगावॉट वीजनिर्मितीसाठी सरासरी सहा ते दहा कोटींपर्यंत खर्च येतो. त्यानुसार सोलर पार्क प्रकल्प होणार आहे.

Web Title: mumbai maharashtra news first solar park in dhule