तीन कोटी मुलांना देणार जंतनाशक गोळी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

मुंबई - कृमीदोष हा लहान वयात सहज होणारा व गंभीर आजार आहे. याचा थेट दुष्परिणाम बालकांच्या शारीरिक व वैयक्तिक विकासावर होतो. याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य विभागाकडून उद्यापासून 10 ते 15 फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमात राज्यातील वय वर्ष 1 ते 19 वयोगटातील सुमारे दोन कोटी 71 लाख 48 हजार 502 बालकांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मातीतून प्रसारित होणाऱ्या कृमीदोषाचे प्रमाण महाराष्ट्रात 29 टक्के आढळून आले आहे. त्याच अनुषंगाने राज्यात "राष्ट्रीय जंतनाशक दिन' वर्षातून दोनदा राबविण्यात येत आहे. जंतनाशक मोहिमेमुळे बालकांमधील रक्तक्षय, अशक्तपणा व कुपोषणावर नियंत्रण, तसेच बालकांचा बौद्धिक व शारीरिक विकास होणे याचा समावेश आहे. हत्तीरोगग्रस्त जिल्हे (गोंदिया, चंद्रपूर, नांदेड आणि चंद्रपूर व नांदेड महानगरपालिका) वगळता इतर जिल्हे व मनपा येथे राष्ट्रीय जंतनाशक दिन राबविण्यात येणार आहे. ही मोहीम राबविण्यासाठी शाळा व अंगणवाडी या संस्था विशेष भूमिका बजावणार आहेत. त्यामध्ये सर्व सरकारी शाळा, सरकारी अनुदानित शाळा, आश्रमशाळा, महानगरपालिका व सर्व खासगी अनुदानित शाळा, त्याचबरोबर सर्व ग्रामीण व शहरी अंगणवाडी व मिनी अंगणवाडी केंद्रे यांचा समावेश आहे.

"अल्बेंडोझॉल' ही कृमिनाशक गोळी घेण्याची पद्धत प्रत्येक वयोगटानुसार वेगळी आहे. आजारी बालकांना जंतनाशकाची गोळी देऊ नये, जंतनाशकाची गोळी लहान मुलांना तशीच गिळण्यासाठी सांगू नये व गोळी घरी खाण्यासाठी पालकांच्या हातात देऊ नये, जेणेकरून या मोहिमेंतर्गत बालकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ नयेत, असे निर्देश आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत.

Web Title: mumbai news maharashtra news 3 crore child Pesticide pill