समाज माध्यम म्हणजे दुधारी शस्त्र!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

वर्तमानपत्रे, न्यूज चॅनेलसमोर सोशल मीडियाच्या असलेल्या आव्हानांविषयी माध्यमतज्ज्ञ आणि माजी खासदार भारतकुमार राऊत, ‘एबीपी माझा’चे कार्यकारी संपादक राजीव खांडेकर आणि बीबीसी मराठी वेब पार्टलचे संपादक आशीष दीक्षित यांच्याशी ‘साम’चे संपादक नीलेश खरे यांनी साधकबाधक चर्चा केली. नेतृत्व घडवण्यासाठी समाज माध्यमांचा प्रभावी वापर करताना ते दुधारी शस्त्र असल्याचे भानही राखले जावे, असा इशारा या तज्ज्ञांनी आपल्या अनुभवातून दिला. 

समाज माध्यमाची ताकद ओळखा
भारतकुमार राऊत (ज्येष्ठ पत्रकार आणि माध्यमतज्ज्ञ)

समाज माध्यम तुम्ही कसे वापरता, काय वाचता तसेच काय पाहता यातून तुमची प्रतिमा आणि नेतृत्व तयार होत असते. त्यामुळे त्याचा वापर सावध आणि सजगरीत्या करायला पाहिजे. समाज माध्यम हीदेखील अफूची गोळी आहे. त्याचा व्यापार होतच राहणार. त्याचे चांगले-वाईट परिणाम आहेत. ज्याचा वापर कसा करायचा, हे आपल्या हातात असते.

समाज माध्यम काही धर्मादाय काम करायला बसलेले नाही. त्यामुळे या माध्यमावर लिहिताना लेखकांनी स्वत:ला आवरले पाहिजे. इथे स्वातंत्र्य आहे पण आणि नाहीसुद्धा. वर्तमानपत्र आणि टीव्हीमध्ये वाचक किंवा प्रेक्षकांच्या प्रतिसादाला मर्यादा आहेत; मात्र सोशल मीडियावर चारही बाजूंनी प्रतिसाद असतो. माहिती आणि विचारांची आदानप्रदान विलक्षण असते. मी नियमित ब्लॉग लिहितो. काही वेळा एखादी पोस्ट २० ते ३५ लाख वाचकांकडून वाचली जाते. ही ताकदही याच माध्यमाची आहे.

*******************************

सोशल मीडियाचा वापर स्मार्ट हवा
राजीव खांडेकर (कार्यकारी संपादक, एबीपी माझा)

सोशल मीडियाचा योग्य आणि नियंत्रित वापर केला तर त्याचा उपयोग तुमचे व्यक्‍तिमत्त्व घडवण्यासाठी करता येतो. स्वत:ला सांभाळून या माध्यमाचा उपयोग करा. प्रत्येक काळात असे एक माध्यम असते ज्याची तरुणांना भुरळ पडते; पण त्याचा वापर कसा करायचा आणि त्यात किती वाहवत जायचे हे आपल्या हातात असते. 

सोशल मीडियामुळे तरुण पिढी वाया वगैरे जातेय असे खापर या माध्यमावर फोडायची गरज नाही. संशोधनाअंती आलेली ही माध्यमे काही वाईटासाठी आलेली नाहीत. त्याचा वापर आपण कसा करतो ते महत्त्वाचे. यू-ट्युबवर खूप चांगले माहितीपट असतात. ते पाहायचे की नुसताच चावटपणा करायचा, हे आपण ठरवायला हवे. सोशल मीडियाचे फायदे आहेत तसे दुष्परिणामही. या माध्यमात अंधारात राहून कोणावरही बाण चालवता येतो. कारण, इतर सर्व माध्यमांवर जबाबदारी आहे; पण सोशल मीडियावर नाही. पण निदान आलेल्या माहितीचा खरे-खोटेपणा पडताळण्याची खबरदारी तरी घेता येईल. 

*******************************

समाज माध्यम हे एक विज्ञान आहे
आशीष दीक्षित (संपादक, बीबीसी मराठी वेबपोर्टल)

समाज माध्यम हे एक विज्ञान आहे, ज्याचा अभ्यास करून वापर करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे नेतृत्व करणाऱ्यांनी तर या माध्यमाचा जाणीवपूर्वक अभ्यास केला तर तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा प्रभावी वापर करता येईल. समाज माध्यम समजून घेणे ही काळाची गरज आहे. तिथे असलेली सगळी व्यासपीठेही वेगवेगळी आहेत. उदाहरणार्थ ट्विटरवर तुम्ही केवळ काही शब्दांत माहिती किंवा मत व्यक्‍त करू शकता. इन्स्टाग्रामवर तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने तिथे तुम्हाला ‘इमोशन’चा अधिक वापर करावा लागतो. या माध्यमांचे स्वरूप लक्षात घेऊन त्याचा वापर करता आला तर ते एक अस्त्र आहे.

समाज माध्यमांनी आपल्याकडून पैशांपेक्षाही महत्त्वाच्या अशा आपल्या ‘प्रायव्हसी’वर घाला घातला आहे. 

Web Title: mumbai news social media society is a miserable weapon