...नव्या सत्ता समीकरणांना जन्म 

विनायक लिमये
गुरुवार, 2 मार्च 2017

राज्यातील 26 जिल्हा परिषदा आणि दहा महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी संपून त्याचे निकालही लागले. या निवडणुकांमध्ये सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. अशा परिस्थितीत राज्याच्या इतिहासातच प्रथमच भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळाले आहे. या दणदणीत यशामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र त्याचबरोबर काही नव्या सत्ता समीकरणांना जन्म मिळाला आहे. या परिस्थितीचा वेध...

मुंबईतल्या एका सभेत भाषण करताना पाणी पिण्यासाठी थांबलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "आज पाणी पितोय तेवीस तारखेला विरोधकांना पाणी पाजेन' असे उद्‌गार काढले होते आणि ते खरेही करून दाखविले. अडीच वर्षांपूर्वी राज्याची सत्ता हाती घेतली तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केवळ पंतप्रधानांचा माणूस म्हणून पाहिले जात होते. मात्र नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत फडणवीसांनी मिळविलेल्या यशाने त्यांच्यावर लोकनेतेपदाची नाममुद्रा कायम केली आहे. 
निवडणुकीच्या रणसंग्रामात कार्यकर्त्यांना तसेच पक्षातल्या अनेक नेत्यांना एकाच व्यक्तीचे आकर्षण आणि त्याचबरोबर भयही असते. कोण असेत अशी व्यक्ती अर्थातच अशी व्यक्ती म्हणजे निवडणूक जिंकून देईल ती. निवडणुका जिंकायला किंवा लोकांमध्ये पक्षाचा कार्यक्रम पोचवण्यासाठी एक चेहरा गरजेचा असतो आणि असा चेहरा देशपातळीवर तसेच राज्य पातळीवर प्रत्येक पक्षाला हवा असतो. त्या त्या पक्षाची ती आवश्‍यक गरज असते. महाराष्ट्रात ही गरज गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या रूपाने भरून काढली गेली होती. महाजन यांची शहरी भागात, तर मुंडे यांची ग्रामीण भागात "क्रेझ' होती. या दोघांच्या निधनानंतर भारतीय जनता पक्षाला राज्य पातळीवर अशा एका चेहऱ्याची आणि एका कणखर नेतृत्वाची गरज होती. देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदी शपथविधी झाल्यानंतर यांच्याबद्दल पक्षात आणि नोकरशाहीमध्ये काही प्रमाणात साशंकता होती. खरेतर नशिबाने आणि त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे व विधिमंडळातील कामगिरीमुळे फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रिपद चालून आले. पक्षांतर्गत पातळीवर फडणवीस यांच्यापेक्षा अनेक ज्येष्ठ नेते असूनही दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी फडणवीस यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे त्यांच्याकडे राज्याची जबाबदारी सोपवली. अर्थात, त्यासाठी केवळ स्वच्छ कारकीर्द हा निकष नव्हता, तर फडणवीसांनी विधिमंडळात सरकारला धारेवर धरण्याची आणि आपल्या अभ्यासपूर्ण कामगिरीने पक्षाची जी इमेज निर्माण केली होती ती जमेची बाजू होती. त्यांच्या निवडीत आणखई एक महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे फडणवीस आपला कार्यक्रम राबवतील अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खात्री होती त्यामुळे त्यांची पसंती अर्थातच फडणवीस यांना मिळाली. त्याचबरोबर पक्षातील मुंडे-गडकरी अशा कुठल्याही गटामध्ये हा नेता अडकलेला नव्हता. उलट दोन्ही गटांचा हा नेता दुवा होता व ही जशी जमेची बाजू होती तशी जात ही पूर्ण अडचणीत आणणारी, किमान महाराष्ट्राच्या राजकारणात तरी वजाबाकी करणारी होती. मात्र पक्षश्रेष्ठी आणि मातृसंस्था या दोन्ही घटकांच्या पसंतीमुळे फडणवीस यांच्याकडे नेतृत्व चालत आले. 

मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर फडणवीस यांनी कुशलतेने आणि संयमाने कारभारास सुरवात केली. त्यांच्या मंत्रिमंडळातील काही सहकारी आक्रमक आणि त्यांच्या खुर्चीला अस्थिर करू शकतील अशा महत्त्वाकांक्षा वृत्तीचे होते. मात्र फडणवीस यांनी त्यांचीही कुशलतेने कोंडी केली. ही नेतेमंडळी एक तर स्वतःच्या कृत्यांमुळे अडचणीत आली, तसेच जनाधाराच्या बाबतीतही काही ठिकाणी कमी पडली. (नगरपालिका निवडणूक किंवा अन्य आंदोलने किंवा स्थानिक प्रश्‍न हाताळण्यात) अर्थात गेल्या अडीच वर्षांच्या या तपशिलात जाण्यापेक्षा नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीतल्या यशामुळे फडणवीस यांचे स्थान भक्कम झाले आहे. 26 जिल्हा परिषदांमध्ये भारतीय जनता पक्षाला चांगले यश मिळाले. आकडेवारीनुसार ही नुसती जमेची बाजू नसून राज्याच्या ग्रामीण भागात जिथे भाजपचे नावही घेतले जात नव्हते त्या ठिकाणी भाजपचे चिन्ह तर पोचलेच आणि काही ठिकाणी उमेदवारही निवडून आले. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या यांच्यातील कामगिरीचे महत्त्व शहरी भागातील मतदारांना, तसेच अनेक पत्रपंडितांना उमजणार नाही; पण ज्याला महाराष्ट्राच्या राजकारणाची जाणीव आहे त्याला भाजपची इथली कामगिरी किती मोलाची आहे आणि ती ज्या नेत्यामुळे झाली त्या नेत्याचे स्थान कसे भक्कम होते, हे लक्षात येईल. राज्यातील दहा महापालिकांपैकी 9 महापालिकांमध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या फडणवीसांनी आणखी एक मोठी कामगिरी केली ती म्हणजे मुंबईत शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढली. सर्वच्या सर्व 227 वॉर्डांमध्ये प्रथमच निवडणुका लढवताना फडणवीस यांनी मुंबईत पक्षाला 82 नगरसेवक मिळवून दिले आणि शिवसेनेला भाजपची दखल घ्यायला लावली. अर्थात त्यासाठी त्यांनी आशिष शेलार विनोद तावडे यांच्यासारख्या मुंबईतल्या नेत्यांवर विश्‍वास टाकला, उमेदवारी निवडीत त्यांच्यावर विश्‍वास टाकला हे महत्वाचे आहे. हे त्यांचे लखलखते यश असले, तरी उद्या त्यामुळेच त्यांच्यासमोर अनेक कसोटीचे प्रसंग येणार आहेत. 

राजकारणात आणि निवडणुकीच्या लढाईत यश मिळविणे हे जितके महत्त्वाचे असते तितकेचे त्या यशासाठी केलेल्या तडजोडी आणि त्या यशानंतरचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असते. कुठलाही धोका पत्करल्याशिवाय कुठल्याही राजकारण्याला लोकनेतेपदापर्यंत जाता येत नाही. राज्यातील या निवडणुकांमध्ये फडणवीस यांनी थेट स्वतः उतरून धोका तर पत्करलाच; पण आपले मुख्यमंत्रिपदही पणाला लावले होते. ही मोठी रिस्क होती. फडणवीस यांच्याकडे असलेल्या जमेच्या बाजू लक्षात घेता हा मोठा जुगार होता. हा जुगार फसला असता तर त्यांची खुर्ची गेलीच असती असे नाही; पण डळमळीत नक्की झाली असती. त्यांनी घेतलेले कष्ट, विरोधकांची संपत चाललेली विश्वासार्हता आणि नशिबाची साथ या त्रिसूत्रीवर फडणवीसांचा जुगार यशस्वी ठरला आहे. विधिमंडळाच्या राजकारणात पंचविशी पूर्ण करणाऱ्या या नेत्याने मिळविलेले यश कौतुकास्पद तर आहेच; पण राज्याचे दिल्लीतील स्थान वाढवणारे आहे. स्थानिक स्वराज संस्थांमधल्या निवडणुकांच्या यशाला फडणवीस यांना दुसऱ्या फळीतून पहिल्या फळीतला राज्यातील नेता हा बहुमान दिला असला, तरी पुढच्या अडीच वर्षांत अनेक आव्हानांना तोंड देण्याची जबाबदारी या यशाने त्यांच्यावर आली आहे. 

जनमानसात असलेली सुप्त मोदी लाट, त्याचबरोबर कॉंग्रेस-राष्ट्रवादी या दोन पक्षांची गेल्या पंधरा वर्षांतली ढासळत गेलेली कामगिरी आणि या नेत्यांची मुजोरी हादेखील फडणवीस यांच्या यशातला महत्त्वाचा फॅक्‍टर आहे. फडणवीस यांनी 10 महापालिका आणि 26 जिल्हा परिषदांमध्ये आपल्या पक्षाची कामगिरी चांगली करण्यासाठी बाहेरच्या पक्षातून येणाऱ्या अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने पक्षात घेतले आणि त्यांना तिकीटवाटप केले त्यामुळे पक्षातल्या अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याचे चित्र उभे राहिले. अनेकांना निवडणूक लढण्याची संधी नाकारली गेली. हा आपद्‌धर्म होता असे सांगत, निवडणुकीत विजय मिळण्यासाठी हे करावे लागते, असे फडणवीस यांनी काही मुलाखतीत, पक्षातील या इनकमिंगचे समर्थन करताना सांगितले होते. युद्धात विजय मिळवण्यासाठी काही वेळेला गिमिक्‍सचा वापर करावा लागतो त्यामुळे पक्षात आलेल्यांना तिकिटे देणे किंवा मोठ्या प्रमाणात अनेकांना पक्षात घेऊन त्यांना मानाचे स्थान देणे हे निवडणूक जिंकण्याच्या तंत्राचा भाग मानले, तरी आता विजयानंतर पक्षातील कार्यकर्त्यांना सन्मानाने वागविणे बाहेरच्यांचा उपमर्द न करता पक्षाच्या विचारधारेची ओळख करून देणे आणि आपल्या साच्यात त्यांना बसवणे हे बिकट आव्हान फडणवीस यांच्यासमोर आहे. पुणे महापालिकेत अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीच्या आधी एक तास पक्षात आलेल्या रेश्‍मा भोसलेंसारख्या उमेदवार थेट महापौर होण्याची इच्छा व्यक्त करून आपण या पदासाठी कसे योग्य आहोत आणि आपल्यालाच ते पद देणे कसे योग्य आहे, यासाठी दबावाचे राजकारण करतात. फडणवीस यांना पक्षात आलेल्या अशा नव्या मंडळींच्या आशा-आकांक्षांना आवर घालावा लागेल. हे उदाहरण अशासाठी दिले आहे, की राज्यात अशा व्यक्तींना कसे हाताळायचे हा मोठा प्रश्न फडणवीस यांच्यासमोर आहे. कारणकेवळ पुण्यातच नाही तर अनेक ठिकाणी बाहेरच्या मंडळींसाठी रेडकार्पेट घातले गेले होते. 

गेल्या अडीच वर्षांत विविध महामंडळे आणि विविध सरकारी संस्थांमधील लोकनियुक्त प्रतिनिधींच्या जागा वाटपाचे काम या सरकारला करता आलेले नाही. सत्ता बदलल्याचा फिल कार्यकर्त्यांना यातूनच मिळत असतो आणि सत्ता तळागाळापर्यंत जाते ती अशा विविध पदांवरील कार्यकर्त्यांच्या कामांमधूनच. फडणवीस यांना या रखडलेल्या नियुक्‍त्या आणि विविध पदांचे वाटप आता तातडीने करावे लागेल. त्याचबरोबर सत्तेतील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेला योग्य पद्धतीने हाताळण्याचे कठीण काम त्यांना करावे लागणार आहे. निवडणूक प्रचारात कारण नसताना पक्षातील काही वाचाळ नेत्यांमुळे शिवसेना नको तेवढी दुखवाली गेली आहे. तसेच 82 जागा मिळाल्यामुळे शिवसेनेला असुरक्षित देखील वाटावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी लवचिकता दाखवत, पक्षाचा अपमान होणार नाही, याची काळजी घेत आक्रमक अशा शिवसेनेला आपल्या बरोबर ठेवण्याचे काम फडणवीस यांना करावे लागणार आहे. 
गेल्या अडीच वर्षांत फडणवीस यांच्या सरकारवर म्हणावा असा कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. त्याचबरोबर हे सरकार जलद गदतीने काम करत नसले तरी काही तरी काम करीत आहे, अशी भावना जनतेमध्ये निश्‍चितच निर्माण झाली होती. त्याचा फायदा फडणवीस यांना या निवडणुकीत नक्कीच झाला. मात्र मराठा मोर्चासारखे आव्हान, गोवंश हत्या बंदीने निर्माण झालेली परिस्थिती आणि राज्यात लाखो तरुणांच्या रिकाम्या हातांना काम देणे या सारख्या कळीच्या मुद्‌द्‌यांना फडणवीस यांना या पुढच्या अडीच वर्षांत हात घालावा लागेल आणि हे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने निर्णायक पावले टाकावी लागणार आहेत. आज यश ही मतदारांनी फडणवीस यांना दिलेली संधी आहे. ही संधी योग्य रीतीने अमलात आणून या संधीचे सोने करण्याची कामगिरी फडणवीस यांना पार पाडायची आहे. 2019 मध्ये जनतेसमोर जाताना फडणवीस यांना या मुद्‌द्‌यांचा शेवट करूनच जावे लागेल. त्याचबरोबर आता आपली खुर्ची अस्थिर होऊ न देणे या लगतच्या आव्हानाचा मुकाबला करून पक्षाचा पाया बळकट करणे, हे लोकनेता म्हणून असलेले कर्तव्य त्यांना बजावावे लागणार आहे.

Web Title: municipal corporation election