बार मॅनेजरचा खून करणारा वस्ताद सापडला सांगलीच्या कदमवाडीत 

प्रमोद बोडके
Thursday, 16 July 2020

11 जुलै रोजी रात्री साडेदहा ते 12 जुलै रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास मॅनेजर प्रभळकर यांचा खून झाला. वस्ताद आकाश मंडल याने सत्तुराचे वार करून खून केला. याबाबतची फिर्याद कैलास प्रभळकर यांचा मुलगा आकाश प्रभळकर (वय 27, रा. श्रीरामनगर, शाहीर वस्ती, भवानी पेठ, सोलापूर) यांनी तालुका पोलिस ठाण्यात दिली होती. या फिर्यादीवरून वस्ताद आकाश मंडल याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. खुनाचा गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी व हॉटेलचा वस्ताद आकाश मंडल फरार होता.

सोलापूर : तुळजापूर रोडवरील हागलुर हद्दीत असलेल्या हॉटेल सौरभ बारचे मॅनेजर कैलास अप्पानाथ प्रभळकर यांचा खून करणारा हॉटेलचा वस्ताद सल्लाउद्दिन ऊर्फ आकाश माणिक मंडल (वय 27, रा. सत सिमुलिया, नाडीचा निमताळा बझार, पश्‍चिम बंगाल) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. मॅनेजरचा खून करून हा वस्ताद कदमवाडीत (ता. विटा, जि. सांगली) आपल्या भावाकडे रहात होता. त्याच ठिकाणाहून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. 

स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांचे पथक गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपीच्या मागावर होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण सावंत यांना गोपनीय बातमीदार मार्फत आरोपी वस्ताद बद्दल माहिती मिळाली. आरोपी आकाश मंडल हा त्याचा भाऊ कतुबुद्दीन मंडल (रा. कदमवाडी, ता. विटा, जि. सांगली) यांच्याकडे वास्तव्यास असल्याचे समजले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांचे पथक कदमवाडी येथे वस्तादच्या भावाच्या घरी पोहोचले. त्या ठिकाणी वस्ताद पोलिसांना आढळून आला. या गुन्ह्याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून या गुन्ह्याची माहिती घेतली. वस्ताद आकाश मंडल याने या खुनाची कबुली दिली आहे. अधिक तपासासाठी वस्तादला सोलापूर तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The murderer of the bar manager was found in Kadamwadi of Sangli