Ajit Pawar : सावरकरांच्या मुद्द्यावरुन अजित पवारांचं भाजपला थेट आव्हान; म्हणाले...

Ajit Pawar News
Ajit Pawar Newsesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगरः महाविकास आघाडीच्या वतीने छत्रपती संभाजी नगरमध्ये वज्रमूठ सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यावेळी अजित पवार यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले. शिवाय त्यांनी भाजप आणि शिंदे गटावरही टीका केली.

यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले की, महाविकास आघाडी येत्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा-विधानसभा निवडणुकीत एकदिलाने लढेल, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. मागच्या काही काळात जे घडलं ते जनतेला आवडलेलं नाही. महाराष्ट्रातलं सरकार ज्या पद्धतीने पाडण्याचा प्रकार झाला, त्यातून नियमांना तिलांजली देण्याचा प्रकार घडला.

असंच झालं तर महाराष्ट्रात चांगले उद्योग येणार नाहीत, प्रशासकीय व्यवस्थेवर जरब राहणार नाही. अशा पद्धतीने राजकारण झालं तर पुढे अवघड आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह काढून घेतलं असलं तरी सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल, अशी मला खात्री आहे.

मराठवाडा ही साधूसंतांची भूमी आहे. महाराष्ट्राला पुढे नेण्याकरीता मराठवाड्याने सर्वस्व अर्पण केलं आहे. भारत स्वातंत्र्य होऊनही १३ महिने मराठवाडा संघर्ष करीत होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम सभेला फक्त १३ मिनिटं वेळ दिला, ही एक प्रकारे मराठवाड्याची आणि स्वातंत्र्य सैनिकांची उपेक्षाच आहे.

मुख्यमंत्र्यांवर बोलतांना अजित पवार म्हणाले की, तुम्ही स्वतःला सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री समजता परंतु मागच्या सहा महिन्यात मराठवाड्याला अथवा शेकऱ्यांना कसलाही दिलासा दिला नाही. मागे काही नेत्यांकडून महापुरुषांचा अवमान झाला मात्र कुणीही काही बोललं नाही. तेव्हा यांची दातखिळी बसली होती का? असा प्रश्न उपस्थित करुन त्यांनी सत्तापक्षातील नेत्यांवर आसूड ओढला.

पुढे बोलतांना अजित पवार म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने हे शक्तिहीन, नपुंसक सरकार असल्याचं म्हटलं आहे. या सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे. रोज ९ शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्यांच्या मालाला भाव मिळत नाहीये, हे कसलं सर्वसामान्यांचं सरकार? यांचा पायगुण चांगला नाही, त्यामुळे सगळे उद्योग देशाबाहेर गेले. बेरोजगारांनी जायंचं कुठे? 75 हजार नोकऱ्या देणार म्हणत होते, कुठे गेल्या नोकऱ्या? तरुणांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार सुरु असल्याचा आरोप पवारांनी यावेळी केला.

अजित पवार पुढे बोलतांना म्हणाले की, तुमच्यात खरंच ताकद असेल तर सावरकरांना भारतरत्न देऊन दाखवा. महागाई आणि बेरोजगारीवरचं लक्ष दुसरीकडे नेण्याकरीता सध्या राजकारण सुरु असून शेतकऱ्यांचे, उद्योगजकांचे प्रश्न असतांना जाणीवपूर्वक वातावरण खराब करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी सरकारवर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com