
Nana Patole : काँग्रेसमध्ये गोंधळ? पटोलेंच्या घोषणेआधीच केदार यांचा अडबालेंना पाठिंबा
नागपूर - मागील काही दिवसांपासून काँग्रेस पक्षातील अंतर्गत गोंधळ सातत्याने समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच डॉ. सुधीर तांबे यांनी तिकीट मिळाल्यानंतरही उमेदवारी जाहीर न करता मुलगा सत्यजीत तांबे यांना अपक्ष उमेदवारी दाखल करायला लावून काँग्रेस पक्षाला अडचणीत आणलं. त्यातच आता काँग्रेस पक्षातील अंतर्गत गोंधळ सुनील केदार यांच्यामुळे चव्हाट्यावर आला आहे. (Nana Patole news in Marathi)
हेही वाचा: Ajit Pawar : शुभांगी पाटलांना पाठिंबा देण्याबाबत NCP-Congress सावध! अजितदादा, म्हणाले...
नागपूर विभाग शिक्षक मतदार संघात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे सुधाकर अडबाले यांना काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे. माजी मंत्री सुनील केदार यांनी काँग्रेसचं समर्थन जाहीर केलं आहे. वास्तविक पाहता, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही घोषणा करणं अपेक्षित होतं. मात्र केदार यांनी घोषणा केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे नाना पटोले यांच्या अनुपस्थित ही बैठक पार पडली. नाना पटोले यांनी उद्या पत्रकार परिषद घेऊन समर्थन जाहीर करणार असल्याचं सांगितल्यानंतरही केदार यांनी बैठक घेत समर्थन जाहीर केलं. त्यामुळे काँग्रेस पक्षातील गटबाजी समोर आली आहे.
हेही वाचा - भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...