esakal | नांदूर मध्यमेश्‍वरमध्ये भरलं पक्षिसंमेलन ! 
sakal

बोलून बातमी शोधा

nandur-madhmeshwar-bird

जिल्ह्यातील धरणे शंभर टक्के भरली आहेत. धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाल्याने यंदा हिवाळ्यात पक्षी येतील की नाही, असा प्रश्‍न निर्माण झालेला असताना, गेल्या आठ दिवसांपासून नांदूर मध्यमेश्‍वर (ता. निफाड) अभयारण्यात हजारो पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे. 

नांदूर मध्यमेश्‍वरमध्ये भरलं पक्षिसंमेलन ! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक - जिल्ह्यातील धरणे शंभर टक्के भरली आहेत. धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाल्याने यंदा हिवाळ्यात पक्षी येतील की नाही, असा प्रश्‍न निर्माण झालेला असताना, गेल्या आठ दिवसांपासून नांदूर मध्यमेश्‍वर (ता. निफाड) अभयारण्यात हजारो पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे. 

अभयारण्यात 250 पेक्षा अधिक जातींच्या पक्ष्यांचे दर्शन होत आहे. चमचा, शराटी, वारकरी, राखी बगळा, रातबगळा, पाणकाडी बगळा, पाणकावळे, जांभळी पाणकोंबडी, राज्यपक्षी हरियाल, पावश्‍या, घुबड, वेडा राघू, कोतवाल, हुदहुद, नीलपंख, सुतार, तरंग, गडवाल, मलार्ड, थापट्या, किंगफिशर, हळदी-कुंकू आदींसह अनेक पक्षी इथे मुक्कामी पोचले आहेत. पक्षी निरीक्षणला येणाऱ्यांसाठी वन विभागाने विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. अभयारण्यात पक्ष्यांच्या छायाचित्रांसह माहिती देण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तंबू, विश्रांती कक्ष, गाइड आदींचा सुविधांमध्ये समावेश आहे. 

हिवाळ्यात नांदूर मध्यमेश्‍वर अभयारण्यात मोठ्या संख्येने पक्ष्यांचे आगमन होते. आम्ही दर महिन्याला पक्षिगणना करत असून, पक्ष्यांच्या हालचालींवर लक्ष आहे. पर्यटकांना पक्षी पाहण्यासाठी दुर्बिणी उपलब्ध करून दिल्या आहेत. टॉवरवर सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आला आहे.'' 
- भगवान ढाकरे, वन परिक्षेत्र अधिकारी, पक्षी अभयारण्य 

यंदा खूप पाऊस पडल्याने पक्षी येतील की नाही, अशी शंका होती. पण, गेल्या आठ दिवसांत पक्ष्यांची संख्या पाच हजारांच्या पुढे गेल्याचे आढळून आले. यंदा इथे पक्षी मोठ्या संख्येने पाहता येतील.'' 
- डॉ. जयंत फुलकर, पक्षिमित्र 

loading image
go to top