परब हल्ल्यात नितेश राणेंना अडकवण्याचा प्रयत्न;नारायण राणेंचा आरोप

नारायण राणे : अन्याय झाल्यास न्यायालयात दाद मागणार
 Narayan Rane
Narayan Rane esakal

कणकवली : संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना मुद्दामहून अडकवलं जातंय. सत्ताधारी प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर करत आहेत. साधं खरचटल्याचा प्रकार झाला असताना ३०७ सारख्या गंभीर गुन्ह्याचं कलम लावल जातय; मात्र आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही हायकोर्ट प्रसंगी सुप्रिम कोर्टात दाद मागणार असल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज येथे स्पष्ट केले. भाजप जिल्हा कार्यकारीणीच्या बैठकीवेळी कणकवलीत (Kankavli) आलेल्या राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, (Ravindra Chavan)भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली (Rajan Teli) उपस्थित होते.

राणे म्हणाले, “परब हल्ला घटनेत आमदार नीतेश राणे याचा सहभाग नव्हता. तरीही पोलिसांनी त्यांच्या विरोधात आरोप पत्र दाखल करून ३०७ सारखं गंभीर गुन्ह्याचं कलम लावले आहे. दुसरीकडे चौकशीच्या नावाखाली पोलिस आमच्या हॉस्पीटलमध्ये येतात. माझ्य पत्नीला हे उघडून दाखवा ते दाखवा सांगतात. नीतेश राणेंच्या मोबाईलची मागणी करतात. पोलिस जे वागताहेत ते चुकीचं आहे. त्याविरोधात आम्ही प्रसंगी न्यायालयात दाद मागणार आहोत.”

सिंधुदुर्गात राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक येतात. राज्यभरातील पोलिस इथे तैनात केले जातात. इथे एवढं असं काय घडलंय की प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात केला जातोय? असा सवाल केंद्रीय मंत्री राणे यांनी आज उपस्थित केला. सिधुदुर्गात असं काय घडलं आहे की राज्यातील पत्रकार, तसंच राज्यभरातील पोलिस यंत्रणा सिंधुदुर्गात का आणण्यात आली आहे. साधं खरचटल्यासारखी घटना असताना एवढी वातावरण निर्मिती का केली जातेय. हा सगळा सत्तेचा दुरूपयोग आहे. कणकवलीत मारहाणीची घटना झाली. त्यात नीतेश राणेंचा सहभाग नव्हता; मात्र जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना डांबून ठेवण्यासाठी ३०७ कमलाचा वापर होतोय असेही राणे म्हणाले.

मांजरीच्या आवाजात आक्षेपार्ह काय?

नीतेश राणे यांनी मांजरीचा आवाज काढला यावरून त्यांच्यावर सगळे सत्ताधारी तुटून पडले आहेत. पण हा प्रकार विधीमंडळाच्या बाहेर झाला होता. त्यात एवढे आक्षेपार्ह काय आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा आवाज तर मांजरीचा नाही. तसंच आदित्य ठाकरे आणि मांजराचा काय संबंध आहे. मांजरीचा आवाज काढल्याचा राग कुणाला का आणि कशासाठी यावा असाही सवालराणे यांनी उपस्थित केला.

काही नाचे विधीमंडळात नाचले

विधीमंडळात आमदार नीतेश राणे यांच्यावर जोरदार टीका झाली. त्यांच्या निलंबनाची मागणी झाली. या प्रश्‍नावर बोलताना नारायण राणे यांनी, आमच्याकडे होळीच्या वेळी पैसे देऊन काही लोक नाचतात. तसा प्रकार विधी मंडळात झाल्याचे स्पष्ट केले. कोकणात काही नाचे आहेत. ते नाचले असेही ते म्हणाले. विधानसभा अध्यक्षपदाच्या वादावर बोलताना केंद्रीय मंत्री राणे यांनी तीन पक्षाचे तीन अध्यक्ष करा असा सल्ला दिला. साधा अध्यक्ष निवडीच्यावेळी यांच्यात एकमत होत नाही. ते राज्य कशा प्रकारे चालविणार असाही टोला त्यांनी लगावला.

माझ्या स्थानाला धक्का नाही

परब हल्ला प्रकरणातून आपल्या स्थानाला धक्का पोचविण्याचे काम केले जात असल्याच्या प्रश्‍नाला उत्तर देताना राणे म्हणाले, “माझ्या स्थानाला आजवर कोणीही धक्का लावू शकलेले नाही. किंबहुना ज्या ज्या वेळी माझ्या स्थानाला धक्का पोचविण्याचा प्रयत्न झाला, त्या प्रत्येक वेळी मला बढती मिळाली आहे. पण माझ्या प्रमोशनला मर्यादा आहेत. त्या मर्यादेपर्यंत मी पोचलोय. त्यामुळे या पेक्षा वरच्या पदाची अपेक्षा मला नाही.”

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com