

सोलापूर : शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतदान निर्णायक आहे. या मतदारसंघात विकासापेक्षाही जात-धर्माच्या मुद्द्यांवर मतदार आकर्षिक होतात, असे चित्र दिसून येते. हाच मुद्दा हेरून लोकसभा निवडणुकीत राम सातपुतेंच्या प्रचारार्थ देवेंद्र कोठे यांनी जोरदार भाषण केले होते. विधानसभा निवडणुकीतही त्यांनी विकासाबरोबरच हिंदुत्वाचा मुद्दा जास्त उचलून धरला. त्यातूनच त्यांनी हैदराबादच्या माधवी लतांचे व्याख्यान ठेवले, पदयात्रा देखील काढली. सोलापुरात आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचे चाहतेही खूप असल्याने त्यांनाही बोलावले. त्यातूनच निवडणूक फिरली आणि ५० हजारांच्या मताधिक्याने देवेंद्र कोठे यांनी निवडणूक जिंकली.
‘माकप’कडून १९७८, १९९५ व २००४ मध्ये आमदार राहिलेल्या नरसय्या आडम यांची व्होट बॅंक मतदारसंघ पुनर्रचनेनंतर २००९ पासून सोलापूर शहर उत्तर व सोलापूर शहर मध्य या मतदारसंघात विभागली. तेव्हापासून आमदार होण्यासाठीची त्यांची धडपड अजूनही थांबलेली नाही. कामगारांसह मजुरांच्या विविध प्रश्नांवर, मालकशाहीविरुद्ध सतत रस्त्यांवरील आंदोलने करणाऱ्या आडम मास्तरांनी १० हजार घरांचा गोदुताई परुळेकर व ३० हजार घरकुलांचा रे- नगरचा प्रकल्पही मार्गी लावला. तरीदेखील, तीन विधानसभा निवडणुकांमधील मतदान पाहिले असता, २००९ मध्ये त्यांना दुसऱ्या क्रमांकाची ३४,६६४ मते होती. त्यानंतर ती कमी कमी होत गेली आणि २०२४च्या निवडणुकीत तर त्यांचे डिपॉझिट देखील जप्त झाले. अशीच स्थिती या निवडणुकीत काँग्रेसची झाली.
सलग तीन टर्म आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदेंच्या या मतदारसंघात ते सांगतील तोच उमेदवार आमदार होईल, असा सर्वांनाच विश्वास होता. मात्र, शिंदेंनी प्रचार करूनही काँग्रेसचा उमेदवार डिपॉझिट देखील वाचवू शकला नाही. निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींसह बांधकाम कामगार, मजुरांसाठी घेतलेली शिबिरे, निवडणुकीत घरोघरी प्रचार व मतदारसंघातील लोक ज्यांना मानतात, त्यांना मतदारसंघात आणले. प्रचारासाठी तरुणांची फौज, जुन्या-नव्या सहकाऱ्यांना सोबत घेतले, हे मुद्दे कोठेंच्या विजयात महत्त्वाचे ठरले. माजी महापौर श्रीकांचना यन्नम, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, विनायक कोंड्याल यांनी प्रचाराची धुरा नेटकेपणाने सांभाळली. त्यांना अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी साथ दिली.
मास्तरांची व्होट बॅंक होतेय रिकामी
वर्ष मिळालेली मते
२००९ ३४,६६४
२०१४ १३,९०४
२०१९ १०,५०५
२०२४ ६,८१६
----------------------------------------------------------
‘एमआयएम’ची वाढतेय ताकद
वर्ष मिळालेली मते
२०१४ ३७,१३८
२०१९ ३८,७२१
२०२४ ६१,४२८
लोकसभेला ८९,६७२ अन् विधानसभेला १.१० लाख मते
काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शहर मध्य मतदारसंघातून आमदारकीची हॅट्ट्रिक साधलेल्या प्रणिती शिंदेच लोकसभेच्या उमेदवार असल्याने त्यांना येथून मोठे मताधिक्य मिळेल, अशी खात्री होती. मात्र, त्यांना ९० हजार ४६८ मते मिळाली तर विरोधातील भाजप उमेदवार राम सातपुतेंनी ८९ हजार ६७२ मते घेतली. स्वत:च्याच बालेकिल्ल्यात प्रणिती शिंदेंना अवघी ७९६ मते अधिक होती. याउलट लोकसभेच्या तुलनेत भाजपने विधानसभेला या मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराचे डिपॉझिट जप्त केलेच, दुसरीकडे २० हजार ६०६ मतेही जास्त घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.