राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्येही आता राष्ट्रगीत - उदय सामंत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी समिती 
हिंगणघाट येते प्राध्यापिकेला जाळून ठार मारल्याचा प्रकार समोर आल्याने विद्यार्थिनी, प्राध्यापिका यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी समिती स्थापन करण्यात येणार असून, त्यात महिलांच्या प्रश्‍नांवर काम करणाऱ्या संस्थांचे सात ते आठ प्रतिनिधी असतील, असे सामंत यांनी सांगितले.

गळती रोखण्यासाठी समिती 
शैक्षणिक संस्थांच्या बैठकीत अनेक प्रतिनिधींनी अभियांत्रिकीला विद्यार्थी मिळत नसल्याने जागा रिक्त राहत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर सामंत म्हणाले की, अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त जागा रिक्त राहत आहेत. यासाठी धोरणांमध्ये बदल करण्याची गरज असून, यासंदर्भात पाच तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल.’

पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपासून (ता. १९) राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये दररोज सकाळी राष्ट्रगीतानेच कामकाजाची सुरुवात होईल, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यातील शैक्षणिक संस्थांच्या प्रश्‍नांसदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, उच्च शिक्षण विभागाचे अधिकारी व संस्थांचे प्रतिनिधी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सामंत म्हणाले, ‘महाविद्यालयांच्या कामकाजाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची अंमलबजावणी शिवजयंतीपासून करण्यात येईल. यामुळे राज्यात दररोज किमान १५ लाख विद्यार्थी एकाच वेळी राष्ट्रगीत म्हणणार आहेत. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. महाविद्यालयांना याबाबतचे परिपत्रक पाठविण्यात येणार आहे.’’ या वेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उच्च शिक्षण संचालक धनराज माने उपस्थित होते. 

‘विद्यार्थ्यांना ‘सीईटी’ परीक्षेचा अर्ज भरताना तो चुकल्यानंतर दुसरा अर्ज भरताना पुन्हा शुल्क भरावे लागत होते. आता हा नियम रद्द करण्यात आला असून, विद्यार्थ्यांना दुसरा अर्ज भरावा लागला, तरी एकदाच शुल्क आकारले जाईल. तसेच, विद्यापीठ कायद्यातील काही तरतुदी चुकीच्या असल्याने संस्थाचालकांना अडचणीच्या ठरत आहेत. त्यात बदल करण्याची मागणी होत आहे. यावर अभ्यास करून बदल सुचविण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाणार आहे,’’ असे सामंत यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: National anthems in colleges in state now uday samant