
राष्ट्रीय हॉकी स्पर्धा : महाराष्ट्राची गाठ आता तमिळनाडूशी
पिंपरी : यजमान महाराष्ट्राला आपली आगेकूच कायम राखण्यासाठी आता ११ व्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत (National Hockey Championship) उपांत्यपूर्व फेरीत तमिळनाडूचे (Tamilnadu) आव्हान पार करावे लागेल. दरम्यान, साखळी गटातील अखेरच्या सामन्यात आज (ता.१७)हरियानाने विजय मिळविला.
शहरातील नेहरुनगर परिसरातील मेजर ध्यानचंद मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राने गटातील सर्व सामने जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले होते. त्याच वर्चस्वाची पुनरावृत्ती महाराष्ट्राला आता दाखवावी लागणार आहे. महाराष्ट्राने आतापर्यंत ३२ गोल केले असून, त्यातील १३ गोल चार खेळाडूंनी पेनल्टी कॉर्नवर केले आहेत. तुलनेत तमिळनाडू संघ देखील अपराजित राहूनच बाद फेरीत दाखल होत आहे. फरक फक्त गोल संख्येत आहे. त्यांनी १८ गोल नोंदवले असून, त्यातील फक्त ५ पेनल्टी कॉर्नवर नोंदवले गेले आहेत. महाराष्ट्राने तीन गोल स्विकारला आहे, तर तमिळनाडूने अजून एकही गोल स्विकारलेला नाही.
हेही वाचा: ...तर डॉक्टर घालतील कामावर बहिष्कार
गोल करणाऱ्या खेळाडूंची संख्या बघितली तर त्यात फारशी दूरी नाही. महाराष्ट्राकडून सात, तर तमिळनाडूकडून सहा खेळाडूंनी गोल केले आहेत. महाराष्ट्राचा कर्णधार तालेब शाहने आठ, तर तमिळनाडूच्या सुंदरापंडीने ४ गोल केले आहेत. महाराष्ट्राची ही घोडदौड स्वप्नवत आहे. आजपर्यंतच्या वरिष्ठ गटातील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला अभावानेच यश मिळाले आहे. तुलनेत तमिळनाडूने तीनवेळा तरी पहिल्या दहांत स्थान मिळविले आहे.
प्रतिस्पर्धी संघातील लढतीत २०१५ मध्ये महाराष्ट्राने तमिळनाडूवर ३-१ असा विजय मिळविला आहे. पाच वर्षापूर्वी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत याच मैदानावर हा विजय मिळविला होता. त्यामुळे इतिहास महाराष्ट्राच्या बाजूने आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
हेही वाचा: पानिपत गाथेची शौर्यज्योत प्रज्वलित ठेवण्यासाठी 'पानिपत दुचाकी मोहीम'
अन्य लढतीत दोनवेळचे विजेते आणि तीन वेळचे उपविजेते आणि दोनवेळा तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागलेल्या पंजाबची गाठ त्यांच्या शेजारील राज्य असणाऱ्या चंडिगडशी पडणार आहे. ऑलिंपिक ब्रॉंझपदक विजेत्या संघातील रुपिंदरचा सहभाग हे पंजाबचे वैशिष्ट्य राहिल. गतउपविजेते कर्नाटक आपली आगेकूच कायम राखण्यासाठी बंगालशी खेळतील. हरियाना आणि उत्तर प्रदेश ही तिसरी उपांत्यपूर्व लढत होईल.
आज साखळीतील अखेरच्या सामन्यातून मध्यप्रदेशाचा ५-१ असा पराभव करताना हरियानाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ते सहा गुणांसह गटात अव्वल राहिले. हरियानाकडून संजयने दोन, तर जोगिंदर, बॉबी सिंग, दीपक यांनी एकेक गोल केला. पराभूत संघाचा एकमात्र गोल अमिन खान याने केला.
गट ब - हॉकी हरियाना ५ (जोगिंदर २०वे, संजय २४वे ३९वे, बॉबी सिंग ३५वे, दीपत ३८वे मिनिट) वि.वि. मध्य प्रदेश १ (अमिन खान ३७वे मिनिट)
Web Title: National Hockey Championship Maharashtra Vs Tamilnadu
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..