esakal | नाट्यसंमेलनाचा राज्यव्यापी उपक्रम कौतुकास्पद 
sakal

बोलून बातमी शोधा

नाट्यसंमेलनाचा राज्यव्यापी उपक्रम कौतुकास्पद 

नाट्यसंमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते यशवंत नाट्य मंदिरात झाले. 

नाट्यसंमेलनाचा राज्यव्यापी उपक्रम कौतुकास्पद 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - शतकमहोत्सवी नाट्यसंमेलन एक ठिकाण आणि तीन दिवसांपुरते मर्यादित न ठेवता राज्यात विविध कार्यक्रम राबवून होणार आहे. नाट्य परिषदेचा हा आगळावेगळा उपक्रम कौतुकास्पद आहे. यंदाचे शंभरावे नाट्यसंमेलन उत्साहाने साजरे होईल, अशा शुभेच्छा 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी दिल्या. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून आज नाट्यसंमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते यशवंत नाट्य मंदिरात झाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे, नाट्य संमेलनाच्या उद्‌घाटक सई परांजपे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. शतकमहोत्सवी नाट्य संमेलनाचे बोधचिन्ह साकारणारे मिलिंद प्रभू यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मराठी नाटक "टुरिंग थिएटर'' परंपरेतील आहे. एका गाडीवर बिऱ्हाड टाकायचे आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रयोग सादर करायचे. ज्या वाटेवरून मराठी रंगभूमीने प्रवास केला, त्याच वाटेवरून पुन्हा एकदा चालण्याचा आमचा प्रयत्न आहे. मोठे अंतर कापल्यानंतर विसावा घेत आपण अभिमानाने मागे आणि निश्‍चयाने पुढे पाहतो. हे शंभरावे नाट्यसंमेलन अभिमान आणि निश्‍चयाचा मिलाफ आहे, असे कांबळी म्हणाले.

तंजावर येथे 25 मार्चला नांदी
छत्रपती दुसरे शहाजीराजे यांनी तंजावर येथे आपल्या दरबारात मराठी नाटक सादर केले. त्यांनी तंजावरमध्ये मराठी नाटकाची संस्कृती जपली. त्यांना अभिवादन करण्यासाठी 100 व्या नाट्यसंमेलनाची नांदी तंजावर येथून 25 मार्चला करण्यात येईल. या वर्षीचे मराठी नाट्यसंमेलन तंजावर ते सांगली ते मुंबई असे अखिल भारतीय होणार आहे.

स्थळांबाबत 5 मार्चला निर्णय
नाट्यसंमेलन अवघ्या एका महिन्यावर आले, तरी सांगलीतील उद्‌घाटन व मुंबईतील समारोप समारंभांची ठिकाणे निश्‍चित झालेली नाहीत. स्थळांची निश्‍चिती फेब्रुवारीपर्यंत होण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली होती; परंतु नाट्यसंमेलन अनेक ठिकाणी होणार असल्याने स्थळनिश्‍चितीला उशीर होत आहे. याबाबत 5 मार्चला नियामक मंडळाच्या बैठकीत निर्णय होईल, असे नाट्य परिषदेतर्फे सांगण्यात आले.

100 मुक्कामांचे प्रतीक
बोधचिन्हात नाट्य परंपरेचे हसू आणि आसू हे मुखवटे वेगळ्या पद्धतीने रेखाटले आहेत. पिवळा रंग आशावाद आणि आनंद दर्शवतो, तर निळा रंग समुद्र आणि आकाशाची अथांगता दर्शवतो. मुकुट म्हणून भारताचे प्रवेशद्वार गेटवे ऑफ इंडिया दाखवण्यात आले आहे. ते शंभर मुक्कामांचे प्रतीक आहे. माथ्यावरील 100 ही संख्या म्हणजे आजवर मराठी रंगभूमीसाठी अतुलनीय काम केलेल्या रंगकर्मींना मानवंदना आहे, असे सांगण्यात आले.

loading image
go to top