
आई-वडिलांच्या भेटीची ओढ! नवनीत राणांची मुलं दिल्लीला रवाना
नागपूर : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) तब्बल १२ दिवस तुरुंगात होते. त्यानंतर नवनीत राणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळे गेल्या २१ दिवसांपासून त्यांची मुलांसोबत भेट होऊ शकली नाही. त्यांची मुलगी आणि मुलगा आज दिल्लीला गेले आहेत.
हेही वाचा: Navneet Rana | नवनीत राणा यांचा फोटो व्हायरल झाल्याने शिवसेनेने हॉस्पिटलला धारेवर धरलं | Sakal Media
नवनीत राणांना १२ वर्षांची आरोही नावाची मुलगी, तर सहा वर्षांचा रवनीर नावाचा मुलगा आहे. राणा दाम्पत्य तुरुंगात असताना दोन्ही चिमुकल्यांनी देवाला साकडं घातलं होतं. माझ्या आई-वडिलांची लवकर सुटका होऊ दे, यासाठी प्रार्थना केली होती. अखेर १२ दिवसानंतर राणा दाम्पत्यांना जामीन मिळाला. त्यानंतर नवनीत राणा यांनी दोन ते तीन दिवस लिलावती रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर ठाकरे सरकारने तुरुंगात वाईट वागणूक दिल्याचा आरोप करत राणा दाम्पत्या दिल्लीला रवाना झाले. त्यांनी दिल्लीत लोकसभा अध्यक्षांकडे ठाकरे सरकारची तक्रार केली. तुरुंगातून सुटल्यानंतर आई-वडिल थेट अमरावतीला परत येतील, अशी आशा मुलांना होती. पण, आई-वडिल न आल्याने मुलांनीच थेट दिल्ली गाठून तब्बल २१ दिवसानंतर आई-वडिलांची भेट घेतली.
नेमकं काय होतं प्रकरण?-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालिसा वाचण्यासाठी राणा दाम्पत्यांनी मुंबई गाठली होती. पण, शिवसैनिकांनी त्यांना त्यांच्या खार येथील निवासस्थानी रोखून धरलं होतं. तरीही राणा दाम्पत्य हनुमान चालिसा वाचण्याच्या भूमिकेवर ठाम होते. अखेर मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यानंतर न्यायालयानं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. पण, तुरुंगात आपल्याला वाईट वागणूक दिल्याचा आरोप नवनीत राणांनी केला. मला स्पाँडिलायसीसचा त्रास असून देखील जमिनीवर झोपायला लावले. त्यामुळे माझी प्रकृती अधिक खालावली असंही त्यांनी सांगितलं. अखेर न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर नवनीत राणा यांना थेट लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती ठीक असून तुरुंगात दिलेल्या वागणुकीबद्दल ठाकरे सरकारची तक्रार करण्यासाठी राणा दाम्पत्य दिल्लीत आहे.
Web Title: Navneet Rana Son And Daughter Goes To Delhi To Meet Parents
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..