आम्ही फोडाफोडी केली तर भाजप रिकामं होईल : नवाब मलिक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

आज शपथविधीवरून भाजप व महाविकासआघाडीत चांगलेच वाक्युद्ध रंगले आहे. आज सकाळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारच्या शपथविधीवर जोरदार टीका केली. यालाच राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.    

मुंबई : आज शपथविधीवरून भाजप व महाविकासआघाडीत चांगलेच वाक्युद्ध रंगले आहे. आज सकाळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारच्या शपथविधीवर जोरदार टीका केली. यालाच राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.    

दरम्यान, ठाकरे सरकारच्या शपथविधीवर भाजपने आक्षेप घेतला आहे. महापुरुषांबद्दल आम्हालाही आदर आहे, मात्र शपथविधी हा शपथविधी असतो, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी असल्याचं म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील ठाकरे यांच्या शपथविधीवर आक्षेप घेत आहेत, पण शपथविधीचा हा पायंडा भाजपने लोकसभेतून पाडला आहे, तसं असेल तर आधी लोकसभा बरखास्त करावी लागेल, असं नवाब मलिक म्हणाले.

“भाजप दावा करत होता की 119 आमदार त्यांच्याकडे आहेत, त्यांचे स्वतःचे 105 आणि 14 अपक्ष. मात्र आज तशी परिस्थिती नाही. अनेक आमदार काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडे येऊ इच्छितात. पण आम्हाला फोडाफोडीचे राजकारण करायचे नाही. आमचं भाजपला आव्हान आहे की त्यांनी मतविभाजन मागावं. जी भाजपनं प्रथा सुरू केली आहे, ती पहिल्यांदा त्यांनी दुरूस्त करावी”, असं नवाब मलिक म्हणाले.

दरम्यान,  नवाब मलिक म्हणाले, ''भाजपनं आमचे आव्हान स्वीकारावं, त्यांनी 119 आमदार कुठं आहेत ते दाखवा. भाजपमधील आमदार चलबिचल झाले आहेत. तेथील काही आमदार स्वगृही म्हणजेच काँग्रेस-राष्ट्रवादीत परतण्यासाठी इच्छुक आहेत. आम्ही फोडाफोडीचे राजकारण केले तर भाजप रिकामं होईल.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nawab malik criticize bjp and chandrkant patil