"ज्यांनी नक्षली विचार हातात घेतला त्यांनी आदिवासींवर अत्याचार केले" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pawar

"ज्यांनी नक्षली विचार हातात घेतला त्यांनी आदिवासींवर अत्याचार केले"

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : देशाचा सन्मान राखण्याबरोबरच ज्यांनी देश एकसंध करण्यासाठी संघर्ष केला त्यांचा अभिमान ठेवण्यासाठी समाजातील शेवटच्या घटकात आपल्याला देशाभिमान उभा करावा लागेल. जो आदिवासी या देशाचा मूळ मालक आहे, त्याची अवस्था आज बिकट झाली आहे. त्यांचे परिवर्तन घडवून आणावे, यासाठी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, बिरसा मुंडा यांचा इतिहास त्यांची आठवण म्हणून या ठिकाणी भव्यदिव्य असे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्मारक उभे करावयाचे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

ते सोनोशी ( ता. इगतपुरी ) येथे आदिवासी क्रांतिकारक राघोजी भांगरे, बिरसा मुंडा यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ, राहीबाई पोपेरे, पालकमंत्री छगन भुजबळ आदी उपस्थित होते.आदिवासी राघोजी भांगरे, बिरसा मुंडा यांच्या क्रांतीचा सन्मान होत आहे याबद्दल मला आंनद होत आहे. अशा गौरवशाली परंपरेचा सन्मान करणे ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे, असेही ते म्हणाले.

पवार म्हणाले की, सामाजिक न्याय व परिवर्तनासाठी संघर्ष केला पाहिजे. मात्र ज्यांनी नक्षली विचार हातात घेतला त्यांनी आदिवासींवर देखील अत्याचार केले. खरा आदिवासी हा सर्वांच्या हिताचा विचार करतो. तो कोणावरही अन्याय करणार नाही. आदिवासी कधीही नक्षली असू शकत नाही. नुकतेच पोलिसांनी नक्षलींना ठार केले. तरुण पिढीला भरकटवून आदिवासी समाज उद्‌ध्वस्त होईल. म्हणून नक्षली विचार आदिवासींच्या हिताचे नाही. त्यांना विरोध करण्याची भूमिका आपल्या सर्वांना घ्यावी लागेल. स्वतः नक्षली भागाचा दौरा करून त्यांच्या अडीअडचणी, दुःख समजून घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ यांनीही मनोगत व्यक्त केले.

"देशाचे प्रथम नागरिक म्हणून आदिवासींना सन्मान, त्यांचे अधिकार देणे गरजेचे आहे. जंगल, पर्यावरणाचे जतन-रक्षणासाठी आदिवासी बांधव झगडत आहे. खोटे गुन्हे दाखल करून त्यांना नक्षली ठरवणे चुकीचे आहे."

- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

loading image
go to top