Ajit Pawar : काहीही झाले तरी विचारधारा आम्ही कधीच सोडणार नाही

काहीही झाले तरी हा विचार आम्ही कधीच सोडणार नाही आणि तशी कल्पना आमच्या घटक पक्षांना दिलेली आहे,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी आज स्पष्टपणे सांगितले.
Ajit Pawar
Ajit Pawarsakal

मुंबई - ‘शिव-शाहू-फुले आणि आंबेडकरांची विचारधारा पक्षाने कुठेही सोडलेली नाही. तो राष्ट्रवादी काँग्रेसचा आत्मा आहे. काहीही झाले तरी हा विचार आम्ही कधीच सोडणार नाही आणि तशी कल्पना आमच्या घटक पक्षांना दिलेली आहे,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी आज स्पष्टपणे सांगितले. विरोधकांकडून राज्यघटना बदलाबाबत खोटी मांडणी केली जात असून त्याचा फटकाही बसल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, चंद्र-सूर्य असेपर्यंत राज्यघटना कोणीही बदलू शकणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंचविसाव्या वर्धापनदिनानिमित्त षण्मुखानंद सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकार जास्त दिवस टिकणार नसल्याचा प्रचार विरोधी पक्षांनी सुरु केला आहे, मात्र येत्या काही दिवसांत ‘एनडीए’चा आकडा ३०० पार झालेला दिसेल, असेही अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर हा पहिलाच वर्धापनदिन होता. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने मुंबईत, तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने अहमदनगर येथे वर्धापनदिन साजरा केला. यावेळी अजित पवार म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नसले, तरी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडच्या एका जागेवर आपल्याला विजय मिळाला आहे.

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाची लाज राखली. संविधान बदलणार म्हणून विरोधी पक्षांनी खोटी मांडणी करण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी झाला. ‘सीएए’बद्दल मुस्लिम समाजात संभ्रम निर्माण केला गेला. आदिवासी-दलित समाजात देखील हीच परिस्थिती निर्माण केली गेली.

पण राष्ट्रवादी पक्ष सरकारमध्ये सहभागी झालेला असला तरी शिव-शाहू-फुले आणि आंबेडकरांचे विचार हा जसा लोकशाहीचा आत्मा आहे, तसा तो राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील आत्मा आहे. काहीही झाले तरी हा विचार आम्ही कधीच सोडणार नाही.’

या कार्यक्रमाला छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांबद्दल विरोधकांकडून जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका अजित पवार यांनी केली. ‘एक जण तर असे बोलतो की जणू काही आमचा आमदार रोज त्याच्याशी फोनवरून बोलत असतो,’ अशा शब्दांत त्यांनी रोहित पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. ‘‘विरोधक जाणीवपूर्वक बातम्या पेरत आहेत. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. लोकसभा निवडणुकीत कापूस, सोयाबीन, दूध प्रश्नांनी फटका दिला. उत्तर महाराष्ट्रात कांद्याने रडविले. याबाबत लवकरच मार्ग काढला जाईल,’’ असे अजित पवार म्हणाले.

खचून जाऊ नका

‘‘लोकसभेत अपयश मिळाले असले तरी खचून जाण्याचे कारण नाही. पुन्हा नव्या जोमाने कामाला लागायचे आहे. आम्ही परत एकदा संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढणार आहोत. मी आठवड्यातील तीन दिवस मुंबईत, तर चार दिवस महाराष्ट्रभरात पक्षाचे काम करणार आहे. येत्या ऑगस्टपर्यंत राज्यसभेत पक्षाचे तीन सदस्य झालेले असतील,’’ असे अजित पवार यांनी सांगितले.

शरद पवार यांच्याबद्दल कृतज्ञता

अजित पवार यांनी पक्षाच्या चोवीस वर्षांच्या वाटचालीचा लेखाजोखा मांडला. आर.आर.पाटील व इतर दिवंगत नेत्यांची नावेही त्यांनी घेतली. पक्षाने चोवीस वर्षांत घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती दिली. चोवीस वर्षे पक्षाचे समर्थपणे नेतृत्व केल्याबद्दल शरद पवार यांच्याबद्दलची कृतज्ञताही अजित पवार यांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com