BJP vs NCP : पहाटेच्या शपथविधीवरुन राष्ट्रवादी-भाजपात जुंपली! रोज सकाळी बदाम खाण्याचा दिला सल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP vs NCP

BJP vs NCP : पहाटेच्या शपथविधीवरुन राष्ट्रवादी-भाजपात जुंपली! रोज सकाळी बदाम खाण्याचा दिला सल्ला

BJP vs NCP : पहाटेच्या शपथविधीबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती. असा गौप्यस्फोट नुकतंचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर शरद पवार यांनी पलटवार केला होता. देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत तसेच सभ्य व्यक्ती आहेत. ते असत्याचा आधार घेत अशी वक्तव्य करतील असं मला कधीच वाटलं नव्हतं, असे शरद पवार म्हणाले. 

शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपात शाब्दिक युद्ध रंगले आहे. भाजपने शरद पवार यांना उत्तर दिले आहे. "शरद पवार साहेब खर तर, 'सत्य-असत्य' बद्दल बोलण्याचा तुम्हाला अधिकारच नाही. पवार साहेब, तुम्ही राजकारणात, स्वतःला सिद्ध करण्यासाठी नेहमीच खोट्याचा आधार घेत इथपर्यंत आलात. तुमचा इतिहास हेच सांगत आहे की, तुम्ही सहकाऱ्यांचा विश्वासघात करूनच स्वतःला सिद्ध केलात," असे भाजपने म्हटले आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने देखील भाजपवर पलटवार केला आहे. "पवार साहेबांच्या उत्तुंग कर्तृत्वाला तुमच्या पोचपावतीची गरज नाही. ज्यांच्या जीवावर तुम्ही सरपंच पदापासून ते पंतप्रधान पदापर्यंतच्या निवडणुका लढत आहात ते तुमचे राष्ट्रीय नेते पवार साहेबांना जाहीर व्यासपीठावरून आपला गुरु म्हणतात आणि मानतात, याचा विसर पडला असेल तर रोज सकाळी बदाम खा", असे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.

काय म्हणाले होते फडणवीस?

'आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली, की आम्हाला स्टेबल गव्हर्नमेंट हवंय, म्हणून आपण सरकार तयार करूया. राजकारणात जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला धोका देतो, तेव्हा चेहरा पाहत बसता येत नाही. मग आम्हीही निर्णय केला. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. जी चर्चा झाली होती ती शरद पवार साहेबांशीच झाली होती. शरद पवारांशी चर्चा झाली त्यानंतर गोष्टी ठरल्या. त्या ठरल्यानंतर गोष्टी कशा बदलल्या हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे, त्यामुळे त्याठिकाणीही आमच्यासोबत विश्वासघातच झाला.

पहिला विश्वासघात हा मी जास्त मोठा मानतो, कारण तो आपल्यासोबतच्या व्यक्तीने केला होता. हा छोटा होता,' असं फडणवीस म्हणाले.

तसेच, 'अजितदादांनी आमच्यासोबत घेतलेली शपथ फसवणुकीच्या नाही तर प्रामाणिक भावनेतून घेतली होती. पण नंतर ते कसे तोंडघाशी पडले हे अजितदादा सांगतील, त्यांनी नाही सांगितलं तर मी सांगीन,' असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं.