राष्ट्रवादी बदलतेय...सत्तेतील चुका सुधारतेय 

प्रमोद बोडके
Sunday, 16 August 2020

युवक व विद्यार्थी आघाडीत, विधानपरिषदेत सर्वसामान्य 
ज्यांना राजकिय पार्श्‍वभूमी आहे, ज्यांच्याकडे घराण्याचे वलय आहे, अशा व्यक्तींना मोठे केल्यास काय होते? याचे परिणाम राष्ट्रवादीला 2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत समजले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस व विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्षपद व इतर कार्यकारिणी असो की विधान परिषद (अमोल मिटकरी) निवडणूक या माध्यमातून राष्ट्रवादीने सर्वसामान्य कुटुंबातील प्रभावी व जनमानसात स्थान असलेल्या तरुणांना संधी देण्याचे धोरण स्विकारल्याचे दिसत आहे. येत्या काळात होणारे महामंडळाचे वाटप व विधानपरिषद निवडणुकीत आणखी कोणत्या सर्वसामान्य तरुणांना संधी मिळते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सोलापूर : निवडून येणाऱ्या लोकांचा पक्ष, सरदारांचा पक्ष यासह अनेक बिरुदावल्या लावून महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका महत्वाची राहिली आहे. 1999 मध्ये जन्मलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला 2014-2019 ही पाच वर्षे वगळता कायमस्वरुपी सत्तेचा घास मिळाला आहे. विरोधी बाकावर बसल्यानंतर आलेला अनुभव आणि सत्तेला नमस्कार घालणारे नेते आता राष्ट्रवादी चांगल्या पध्दतीने ओळखू लागली आहे. त्यामुळे सध्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे वजन चांगलेच वाढले आहे. 

2014 मध्ये सत्तेत येण्यासाठी शिवसेना-भाजपने ज्यावेळी राष्ट्रवादीला डॅमेज केले, त्यावेळी त्यांना सत्तेचा मार्ग अधिक सोप्पा झाला. 2019 मध्ये हाच फॉर्म्यूला वापरला. परंतु, त्याचा ऊलट परिणाम शिवसेना-भाजप युतीला भोगावा लागला. शिवसेनेच्या तुलनेत भाजपला मोठा फटका बसला. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी ज्यांना मोठे केले तीच मंडळी संकटाच्या काळात सत्तेसाठी आज पवारांना सोडून जात आहेत, असा मेसेज तरुणाईमध्ये गेल्याने महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाचा ओपनिंग पोल फेल गेला. 1999 ते 2014 पर्यंत सत्तेत असताना राष्ट्रवादीत फक्त आमदार, माजी आमदार यांच्याच शब्दाला किंमत होती. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे म्हणावे तेवढे लक्ष दिले गेले नाही. 2009 ते 2014 या पाच वर्षात हा अनुभव प्रखरतेने आला. 2019 च्या निवडणुकीत कार्यकर्ता जागेवर राहिला आणि आमदार, माजी आमदारांनी विकासाच्या नावाखाली भाजप-शिवसेनेला जवळ केले. 

यापूर्वी सत्तेत असताना ज्या चुका झाल्या होत्या त्या चुका आता राष्ट्रवादी कॉंग्रेस सुधारताना दिसत आहे. सध्याच्या महाविकास आघाडीच्या सत्तेत आमदारांच्या पत्राला जेवढे वजन आहे तेवढेच वजन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आहे. काम कोणतेही असो त्या भागातील पक्षाच्या पदाधिकऱ्यांची भूमिका विचारात घेण्यात येऊ लागली आहे. त्यामुळे सत्तेत असलेल्या शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते अधिक सक्रिय दिसत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The NCP is changing ... the mistakes in power are improving