पुन्हा एकदा पवार राजकीय पटलाच्या केंद्रस्थानी

प्रशांत बारसिंग
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत 54 जागा मिळाल्या आहेत. मात्र तिसऱ्या क्रमांकावर असूनही राष्ट्रवादी सत्तास्थापनेच्या आखाड्यात चर्चेत आहे. त्यामुळे 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपची अडचण पवार ठरत आहेत. कारण जर राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिला आणि काँग्रेसने बाहेरुन पाठिंबा दिला तर भाजपच्या सत्तास्थापनेत अडथळा येऊ शकतो.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानंतर सध्या सत्तस्थापनेच्या राजकीय घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार केंद्रस्थानी असल्याचे चित्र आहे.

गेल्या काही दिवसात शरद पवारांच्या भूमिकेने महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांची अडचण झाली आहे. शरद पवार यांनी आपण विरोधात बसणार असल्याचे म्हटले असले, तरी त्यांच्या दिल्ली भेटीने अनेक पर्यायांची चाचपणी सुरु असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पवार-सोनिया गांधी यांची भेट झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यास उत्सुक असल्याचे चित्र निर्माण झाले. मात्र सोनिया गांधींनी अद्याप आपला निर्णय दिला नाही. त्यामुळे पवार नेमकी काय भूमिका घेणार याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. आजच्या पत्रकार परिषदेतही शरद पवारांनी आपण विरोधी पक्ष म्हणूनच जबाबदारी पार पाडणार असल्याचे म्हटले आहे..

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत 54 जागा मिळाल्या आहेत. मात्र तिसऱ्या क्रमांकावर असूनही राष्ट्रवादी सत्तास्थापनेच्या आखाड्यात चर्चेत आहे. त्यामुळे 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपची अडचण पवार ठरत आहेत. कारण जर राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिला आणि काँग्रेसने बाहेरुन पाठिंबा दिला तर भाजपच्या सत्तास्थापनेत अडथळा येऊ शकतो.

शिवसेना सुरुवातीपासून मुख्यमंत्रिपदावर दावा करत भाजपशी दोन हात करत आहे. त्याशिवाय संजय राऊत यांनी आमच्याकडे पर्याय असल्याचे सांगत 175 इतके संख्याबळ असल्याचा दावा केला. शिवसेना सध्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा पर्याय पाहून, भाजपकडून महत्त्वाची खाती घेण्याच्या विचारात आहे. मात्र शरद पवारांनी शिवसेनेला थेट विरोध केला तर सेनेची अडचण होईल. 

राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दर्शवण्यासाठी अनुकूलता दर्शवली आहे. मात्र सेनेला थेट पाठिंबा देणे कॉंग्रेससाठी अडचणीचे ठरणार आहे. शिवसेनेला थेट पाठिंबा दर्शवला तर अन्य राज्यात त्याचा परिणाम होऊ शकतो अशी भिती कॉंग्रेस जनांना सतावत आहे. जर काँग्रेसने बाहेरुन पाठिंबा द्यायचं ठरवलं, म्हणजेच बहुमत चाचणीवेळी जर गैरहजर राहायचं ठरवलं, तरी मोठी अडचण होणार आहे. कारण कॉंग्रेसकडे 44 आमदारांचं संख्याबळ आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राज्याचे अख्ख्ये मंत्रीमंडळ, भाजपचे अन्य राज्यातील नेते आणि मंत्री युतीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले होते. या सर्वांना फक्‍त शरद पवार यांना टार्गेट केले असताना पवार यांनी देखिल मोदी-शाहंना अंगावर घेतले होते. त्यामुळे संपूर्ण प्रचाराच्या मैदानात पवार केंद्रस्थानी होते. सध्या सत्तास्स्थापनेच्या घोळाला दोन आठवडे उलटले असले तरी सरकारचे भवितत्व ठरलेले नाही. मात्र शरद पवार या घडामोडींमध्येही केंद्रस्थानी असल्याचे चित्र आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP chief Sharad Pawar play major role in Maharashtra politics