तिवरे धरणप्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जुलै 2019

पत्रात पुढील बाबींबाबत मुख्यमंत्री महोदयांना अवगत केले.
आपत्तीत २३ जण मृत्युमुखी पडले. तिवरे भेदवाडी गावातील नदी किनारी असलेली ४५ घरे पूर्णतः वा अंशतः नष्ट झाली आहेत. घराबरोबर जनावरांचे गोठेही वाहून गेले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पशुधनही प्राणास मुकले.

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल्यानंतर प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. 

शरद पवार यांनी लिहिलेले पत्र पुढीलप्रमाणे : 
8 जुलैला चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणफुटीमुळे बाधित झालेल्या कुटुंबियांची घटनास्थळी जाऊन भेट घेतली, तसेच झालेल्या नुकसानाची पाहणी केली. समक्ष भेटीवेळी मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाल्याचे दिसून आले. स्थानिक ग्रामस्थांचे सांत्वन करताना त्यांच्याशी संवादही साधता आला व दुर्घटनेमुळे निर्माण झालेल्या दुर्गतीबाबत वस्तुस्थिती निदर्शनास आली. ही वस्तुस्थिती राज्याचे प्रमुख म्हणून मा. मुख्यमंत्र्यांना अवगत करण्यासाठी सविस्तर पत्र सादर केले.

पत्रात पुढील बाबींबाबत मुख्यमंत्री महोदयांना अवगत केले.
आपत्तीत २३ जण मृत्युमुखी पडले. तिवरे भेदवाडी गावातील नदी किनारी असलेली ४५ घरे पूर्णतः वा अंशतः नष्ट झाली आहेत. घराबरोबर जनावरांचे गोठेही वाहून गेले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पशुधनही प्राणास मुकले.

नुकसान झालेल्या सार्वजनिक मालमत्तेमध्ये रस्ते, पूल, विद्युतव्यवस्था व इतर मूलभूत सुविधांचा समावेश आहे. तिवरे, फणसवाडी, कुंभारवाडी, भेंदवाडी गावातील नळपाणी पुरवठा योजना धरणफुटीमुळे बाधित झाल्या आहेत. त्यामुळे सदर गावातील पाणीपुरवठा बंद झाला असून टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

धरणफुटीमुळे केवळ पिकेच वाहून गेली नाहीत, तर शेतजमीनही वाहून गेली आहे. आपत्तीत वाचलेल्या मृतांच्या अपत्यांचा व तरुणांच्या रोजगाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

मृत कुटुंबियांच्या वारसांना शासनाने चार लक्ष रुपये इतके सानुग्रह अनुदान दिले असले तरी सदर अनुदान हे कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या वेळी स्थायी आदेशाद्वारे दिले जाणारे अनुदान आहे. मुख्यमंत्री निधी, पंतप्रधान निधी व राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून अनुदान वितरित व्हावे.

वाहून गेलेल्या जमिनीमध्ये सुधारणा करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जावा. पीक नुकसानाचे राहिलेले पंचनामे तातडीने पूर्ण केले जावेत. मृत कुटुंबांच्या मुलांची शिक्षणाची व राहण्याची सोय करावी.

कमावत्या मृत व्यक्तींच्या वारसांना तसेच उपजीविकेचे साधन नष्ट झाल्यामुळे जीवित व्यक्तींना देखील शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरीत सामावून घेतले जावे.

धरणाजवळील फणसवाडी पूल पूर्ण नष्ट झाला आहे, दादर अकणे व दादर-कळकवणे हे दोन पूलही कमकुवत झाले आहेत. त्यांच्या पुनर्बांधणीचे काम हाती घ्यावे लागेल. बाधित कुटुंबांचे धरणापासून दूर सुरक्षित अंतरावर स्थलांतर करून पुनर्वसन करण्यात यावे.

पुणे जिल्ह्यातील माळीण दुर्घटनेच्या वेळी तत्कालीन सरकारने तातडीने मदतकार्य सुरू केले होते. मुख्यमंत्री निधी, पंतप्रधान निधी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधी व इतर मार्गाने मदत बाधित कुटुंबांपर्यंत पोहचवली. शासनाच्या प्रचलित योजना प्राधान्यक्रमाने राबवल्या. त्याच धर्तीवर तिवरे गावातील ग्रामस्थांचा व बाधितांचा विचार व्हावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP chief Sharad Pawar writes letter to Devendra Fadnavis on TIware dam