
आम्ही परत येऊ देतो का? शरद पवार यांचा फडणवीसांना टोला
उस्मानाबाद : संकटावेळी राजकारण आणायचं नाही. पण, काहींना राजकारण आणल्याशिवाय चैनच पडत नाही. काहींची सत्ता गेली तेव्हा त्यांची झोप गेली. निवडणूक, मतमोजणी, निकाल लागायचा बाकी असतानाच काहीतरी सांगायचे म्हणून काहींनी ‘मी परत येणार, येणार’ असा नारा दिला. पण आम्ही येऊ देतो काय? लोकांनी काय ठरवायचे ते ठरविले आणि महाविकास आघाडी यशस्वी झाली, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता टोला लगावला.
आम्ही राज्य उभे करू शकतो हे आम्ही एकत्र बसून ठरविले. आता कुणीही काही म्हणो, देशात स्थिर राज्य देण्यासाठी महाविकास आघाडी यशस्वी झाली. ही आघाडी केवळ सत्तेसाठी नाही तर महाराष्ट्राचा चेहरा बदलण्यासाठी आहे. त्यासाठी ती अहोरात्र प्रयत्न करील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या सदस्या, राष्ट्रवादी काँग्रेस युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी पाडोळी (जि. उस्मानाबाद) गटात केलेल्या विकासकामांचे लोकार्पण, उद्घाटन पवार यांच्या हस्ते रविवारी (ता. ६) झाले. त्यावळी ते बोलत होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आदी उपस्थित होते.
हेही वाचा: Video: मंत्र्याच्या गाडीवर चढून हल्ला; भाजपवर आरोप करत केजरीवाल म्हणाले...
राज्य चालवायचे, भविष्य उत्तम घडवायचे असेल तर पुढच्या काळाचा विचार करावा लागतो. सुमारे ५२ वर्षे जनतेसाठी काम करत असून, चार वेळा मुख्यमंत्री झालो, केंद्रात मंत्री झालो. मला जनतेने भरपूर दिले आहे. स्वतःसाठी काही नको, जे करायचे ते जनतेच्या व पुढील पिढीच्या भविष्यासाठी करायचे, याच भूमिकेतून वाटचाल केली, असे पवार म्हणाले.
पदावर बसलेल्यांना तारतम्य नाही
पदावर बसलेल्या लोकांना पद आणि अधिकार यांचे तारतम्य राहत नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर त्यांचे नाव न घेता टीका केली.
Web Title: Ncp Congress Party Bjp Leader Fadanvis
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..