माझा अजित पवारांशी संबंध नाही, मी त्यादिवशी नव्हतो : धनंजय मुंडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

शरद पवार आणि अजित पवार एकच आहेत. अजित पवारांवर माझे प्रेम आहे हा वेगळा मुद्दा आहे. मला माध्यमांसमोर यायला वेळ लागला, कारण मला हे सर्व काही माहिती नव्हतो. मी पक्षाशी आणि पवारसाहेबांशी एकनिष्ठ आहे.

मुंबई : माझा अजित पवारांशी काहीही संबंध नाही. अजित पवारांशी माझा आजपर्यंत संपर्क आलेला नाही. अजित पवारांनी परत यावे असे आम्हाला वाटते. मी त्यादिवशी बंगल्यावर नव्हतो. माझ्या बंगल्यावर कोणाला बोलविले याची कल्पना मला नव्हती, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी दिले आहे.

भाजपने अजित पवारांशी हातमिळवणी करीत अचानक सरकार स्थापन केल्यामुळे संतापलेल्या महाविकास आघाडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर आज (सोमवार) थेट जनतेच्या न्यायालयात 162 आमदारांचे शक्‍तिप्रदर्शन करीत सत्ताधारी भाजप सरकारला आव्हान दिले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची येथील ग्रॅंड हयात हॉटेलमध्ये ओळखपरेड घेण्यात आली. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते व 162 आमदार उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, की शरद पवार आणि अजित पवार एकच आहेत. अजित पवारांवर माझे प्रेम आहे हा वेगळा मुद्दा आहे. मला माध्यमांसमोर यायला वेळ लागला, कारण मला हे सर्व काही माहिती नव्हतो. मी पक्षाशी आणि पवारसाहेबांशी एकनिष्ठ आहे. मी माझ्या पद्धतीने अजितदादांना आवाहन केले आहे. आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष सत्तेत येतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Dhananjay Munde statement about Ajit Pawar and NCP