Vidhan Sabha 2019 : राष्ट्रवादीला बालेकिल्ल्यात खिंडार, हा निष्ठावंत करणार भाजप प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

राष्ट्रवादी काँग्रेसमधून नेते आणि कार्यकर्त्यांचे
होणारे आऊटगोईंग थांबता थांबेनासे झाले आहे. आतापर्यंत राज्यात अन्यत्र असलेले आऊटगोईंगचे हे लोण शनिवारी (ता.21) पुणे जिल्ह्यातही पोहोचले.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधून नेते आणि कार्यकर्त्यांचे
होणारे आऊटगोईंग थांबता थांबेनासे झाले आहे. आतापर्यंत राज्यात अन्यत्र असलेले आऊटगोईंगचे हे लोण शनिवारी (ता.21) पुणे जिल्ह्यातही पोहोचले. पुणे हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा जिल्हा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात पवार यांचेच विश्‍वासू सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश
सरचिटणीस जालिंदर कामठे यांना फोडण्यात भाजपला यश आले आहे. 

कामठे उद्या (रविवारी) दुपारी मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना ही जालिंदर कामठे पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना, पुण्यातील त्यांच्याच सरकारी बंगल्यात
झालेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक आहेत. कामठे यांनी युवक कॉंग्रेस, कोंढवा-येवलेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच, जिल्हा परिषद अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश सरचिटणीस आदी पदांवर काम केले आहे. कामठे हे शरद पवार यांच्याबरोबरच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे
यांचेही विश्‍वासू सहकारी होते.

Vidhan Sabha 2019 : प्रणिती शिंदे यांच्याकडून आचारसंहिता भंग? (व्हिडिओ)

जालिंदर कामठे यांनी शनिवारी रात्री उशिरा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या
प्राथमिक सदस्यत्वाचा आणि प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याकडे पाठविला आहे.

चौकडीमुळे पक्ष सोडला : कामठे

जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील चांडाळ-चौकडीला कंटाळून आणि पुरंदर तालुक्‍यावर अन्याय होत असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी भाकरी फिरविण्याचे आणि एक व्यक्ती एक पद देण्याचे अनेकदा जाहीर केले. परंतुृ प्रत्यक्षात या दोन्ही घोषणांची अंमलबजावणी झाली नाही.

"Vidhan Sabha 2019 : शिवसेनेला शह देत भाजप मुंबई जिंकणार?

आजही जिल्ह्यातील काही घराण्यात पुन्हा पुन्हा आणि एकाहून अधिक पदे देण्यात आलेली आहेत. या चांडाळ-चौकडीच्या खेळीमुळेच इंदापूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे ठेवला गेला आणि त्याबदल्यात पुरंदर कॉंग्रेसला देण्यात आला. यामुळे पुरंदर तालुक्‍यावर मोठा अन्याय झाल्याने, तालुक्‍याच्या विकासासाठी भाजपत प्रवेश करत असल्याचे जालिंदर कामठे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Leader Jalinder Kamthe will join BJP Maharashtra Vidhan Sabha 2019