उपमुख्यमंत्रिपदासाठी अजित पवार नव्हे तर दुसऱ्याच नावावर शिक्कामोर्तब?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला असून, विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशानंतर याबाबत हालचाली होणार असल्याचं निश्चित झालं आहे. मंत्रिमंडळ विस्तारात कोणतं खातं कुणाकडे जातं, याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे.

मुंबई : महाराष्ट्रात एक महिन्याच्या नाट्यानंतर उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, आणि महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले. तसेच याच दिवशी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या इतर सहा नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र पहिल्यांदाच झालेल्या या ऐतिहासिक आघाडीत मंत्रिपदांवरून तिढा निर्माण झाल्याने खातेवाटप रखडले होते. आता मात्र खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला असून, विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशानंतर याबाबत हालचाली होणार असल्याचं निश्चित झालं आहे. मंत्रिमंडळ विस्तारात कोणतं खातं कुणाकडे जातं, याबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे.

विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे गेल्यानंतर उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार, यावर शिक्कामोर्तब झालं आहे. मात्र उपमुख्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत मोठी स्पर्धा असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील आणि अजित पवार या दोन नेत्यांमध्ये उपमुख्यमंत्रिपदाबाबत चुरस आहे. मात्र आता जयंत पाटील यांनाच उपमुख्यमंत्रिपद देण्याबाबत पक्ष सकारात्मक असल्याची माहिती आहे. याबाबत एका दैनिकाने वृत्त दिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: राज्य सरकारचे खातेवाटप निश्चित करण्यासाठी लक्ष घातलं आहे. या पार्श्वभूमीवरच पवार यांनी शिवसेना आणि काँग्रेसच्या नेतृत्वासोबत चर्चा करून सत्तेत समाविष्ट असणाऱ्या तीनही पक्षांच्या वाट्याला येणारी खाती निश्चित केली आहेत. यामध्ये ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला 10, राष्ट्रवादीला 7, तर काँग्रेसला 6 मंत्रालये मिळणार असल्याची माहिती आहे.

गृहमंत्रालय कोँणाकडे? उपमुख्यमंत्रिपदासाठी जयंत पाटील यांचं नाव पुढे आल्यानंतर राज्याचं गृहमंत्रिपदही त्यांच्याकडेच जाणार असल्याचं कळतंय. तर अजित पवार यांच्याकडे अर्थखात्याची जबाबदारी सोपवण्यात येण्याची शक्यता आहे. असं झाल्यास महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जयंत पाटील हेच क्रमांक 2 चे मंत्री ठरू शकतात.

उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. कारण राष्ट्रवादीत अजित पवार यांचा समर्थक मोठा गट आहे. अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद मिळावं, यासाठी त्यांच्या समर्थकांचा पक्षावर दबाव असल्याचंही बोललं गेलं. अजित पवार यांना मोठं पद दिल्यास तीन पक्षांच्या आघाडी सरकारला स्थिरता आणता येईल, असाही मतप्रवाह पक्षात होता. मात्र या स्पर्धेत आता जयंत पाटील आघाडीवर असल्याचं दिसत आहे.

अजित पवारांचं बंड अन्- महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आहे. मात्र त्याआधी महाराष्ट्रात मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळालं. अजित पवार यांचं अचानक बंड...भाजपला पाठिंबा...उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी अन् पुन्हा राजीनामा, यामुळे देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे वेधलं गेलं.

अजित पवारांनी अचानक शरद पवार यांची साथ सोडून भाजपशी सलगी केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यामुळे अजित पवार यांनी नेमकी का बंडखोरी केली? हा राज्यभर चर्चेचा विषय झाला. राज्यातील नेतृत्वावरून राष्ट्रवादीत सुरुवातीपासूनच सुप्त संघर्ष होता. शरद पवार हे दिल्लीत सक्रीय असल्याने राज्यात पक्षाची धुरा कुणाकडे जाणार यावरून अजित पवार की सुप्रिया सुळे काहीशी स्पर्धा असल्याची चर्चा झाली. मात्र शरद पवार यांनी अत्यंत हुशारीने सुप्रिया सुळे यांनाही लोकसभेत संधी दिली तर राज्यातील पक्षसंघटनेत अजित पवार यांच्याकडे अधिकार दिले. मात्र तरीही काका-पुतण्यामध्ये काही निर्णयावरून मतभेद होत असल्याच्या बातम्या समोर येतच राहिल्या. मात्र शरद पवार यांनी वेळोवेळी कुटुंबातील हा संघर्ष चार भिंतींमध्येच संपवला.

यंदाच्या विधानभा निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालं नाही. तसंच भाजप आणि शिवसेनेची निवडणूकपूर्व युतीही मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून तुटली. त्यामुळे राज्यात सरकार स्थापनेचा पेच कसा सुटणार आणि मुख्यमंत्री कुणाचा होणार, याबाबत सर्वच राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा सुरू झाली. भाजपला की शिवसेना, कुणाला पाठिंबा द्यायचा या मुद्द्यावरून राष्ट्रवादीत मतभेद झाले आणि यातूनच मग अजित पवारांनी बंड केलं.

शरद पवारांची साथ सोडताना अजित पवार स्वत:चाच एक डायलॉग विसरले. मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर राज्यासह देशात भाजपचं सरकार आल्यानंतर राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या मतदारसंघात गेल्यावर अजित पवार नेहमी एक डायलॉग वापरायचे. 'वस्ताद पैलवानाला सर्व डाव शिकवतो मात्र एक डाव नेहमीच राखून ठेवतो,' हा तो डायलॉग.

पक्ष सोडून गेलेल्या लोकांना अजित पवार इशारा द्यायचे की, 'मी भलेही तुम्हाला राजकारणात जिंकायचं कसं हे शिकवलं असेल पण एक डाव राखून ठेवलेला आहे.' मात्र अजित पवार स्वत:च शरद पवारांबाबत हा डायलॉग विसरले आणि त्यांचा घात झाला. कारण शरद पवारांनी सूत्र फिरवली आणि काही आमदारांची साथ घेऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांना अवघ्या 79 तासांत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader jayant patil front runner for dy cm post set back for ajit pawar