'हा माणूस सत्तेचा भुकेला; इम्रान खानला मोदींचं प्रेमपत्र'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मार्च 2019

मूळ मुद्द्यांवरून लोकांचं लक्ष विचलित करायचं आणि पाकिस्तानचा भावनात्मक मुद्दा पेटवत ठेवायचा ही कूटनीती पंतप्रधान मोदी वापरत आहेत. पाकिस्तान हा जर इतका बदमाश देश आहे तर मग त्याला हे चोरून प्रेमपत्र पाठवायची काय आवश्यकता आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, पाकिस्तानला शुभेच्छांचा संदेश भारतातर्फे पाठवला गेला हे आपल्याला भारत सरकारकडून कळलेलं नाही. तर पाकिस्तानकडून कळलं असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेचे भुकेले असून त्यांनी पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान इम्रान खानला शुभेच्छा पाठवल्या असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. 

आव्हाड म्हणाले की, यामध्ये गैर काहीच नाही. पाकिस्तानने जर दहशतवाद्यांना पाठिंबा द्यायचा थांबवलं, तर आपल्यालाही पाकिस्तानशी वैर ठेवण्यात काहीही रस नाही. उलट मैत्रीच हवी आहे. मारामारी आणि भांडणात खर्च होणारा वेळ आणि पैसा आपण आपल्या देशाच्या समृद्धीसाठी वापरू शकतो. पण एक दोन गोष्टी प्रचंड खटकतात. पुलवामा आणि बालाकोट प्रकरणानंतर मोदी यांनी आपल्या भाषणांमधून पाकिस्तानबद्दल अहोरात्र गरळ ओकायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानशी वैर, हा केंद्रबिंदू ठेवूनच त्यांचा निवडणूक प्रचार सुरू आहे. आजची प्रचंड बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, ढासळलेली अर्थव्यवस्था, गाळात जात असलेल्या सरकारी कंपन्या, असे अनेक गंभीर प्रश्न आ वासून उभे असताना, त्याबाबत काही बोलण्याऐवजी मोदी फक्त आणि फक्त पाकिस्तानद्वेष आपल्या भाषणांमधून व्यक्त करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

आव्हाड पुढे म्हणाले की, मूळ मुद्द्यांवरून लोकांचं लक्ष विचलित करायचं आणि पाकिस्तानचा भावनात्मक मुद्दा पेटवत ठेवायचा ही कूटनीती पंतप्रधान मोदी वापरत आहेत. पाकिस्तान हा जर इतका बदमाश देश आहे तर मग त्याला हे चोरून प्रेमपत्र पाठवायची काय आवश्यकता आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, पाकिस्तानला शुभेच्छांचा संदेश भारतातर्फे पाठवला गेला हे आपल्याला भारत सरकारकडून कळलेलं नाही. तर पाकिस्तानकडून कळलं असल्याचेही त्यांनी सांगितले. इम्रान खानने ट्विट करुन मोदी यांनी आपल्याला हा संदेश पाठवल्याचं जाहीर केलं असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. एकीकडे अहोरात्र पाकिस्तानच्या नावाने शिमगा करायचा आणि दुसरीकडे चोरुन लव्हलेटर पाठवत बसायचं हाच तो दुटप्पीपणा आहे. असल्याची टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

त्याचबरोबर, देशाची दिशाभूल करण्याचा हा काही पहिला प्रसंग नसल्याचेही आव्हाड यांनी सांगितले आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या शपथविधीला नवाज शरीफ यांना आमंत्रित केलं होतं. त्यानंतर मध्येच वाटेत एखाद्या जिवलग मित्राच्या घरी गल्लीत मोटारसायकल पार्क करून थांबावं, तसे ते विमान इस्लामाबादला उतरवून नवाज शरीफ यांच्या घरी गेले. त्यांना वाढदिवसाचा केक दिला आणि त्यांच्या घरी बिर्याणीवर ताव मारून परत आले असल्याची आठवणही आव्हाड यांनी करून दिली. त्यात कसलीही मुत्सद्देगिरी नव्हती. तो शुद्ध बालिशपणा, चावटपणा आणि एक प्रसिद्धी स्टंट होता असेही आव्हाड यांनी पुढे म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Jitendra Awhad criticize Narendra Modi wish to Pakistan