राष्ट्रवादीचं ठरलं; जागावाटपात एकमत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

- राज्यातील 288 पैकी 220 जागांसंदर्भात एकमत

- काही बदल होऊ शकतात

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेत्यांसोबत जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील सर्वच जागांचा आढावा घेतला. आपल्याकडील तगड्या उमेदवारांच्या सोयीकरिता काही जागांची आदलबदल करण्याचा राष्ट्रवादी आग्रह असून, त्यातील काही जागांबाबत बैठकीत प्राधान्याने चर्चा करण्यात आली. दुसरीकडे मात्र, राज्यातील 288 पैकी 220 जागांसंदर्भात एकमत झाले आहे. परंतु, काही बदल होऊ शकतात, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात झाली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री छगन भुजबळ, शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे आदी नेते उपस्थित होते. राज्यभरातून इच्छुक केलेले अर्ज, आघाडीतील जागावाटपाचे जुने सूत्र, मतदारसंघातील सद्यस्थिती, विरोधकांची ताकद, पक्षांतराचे परिणाम या मुद्दयांवर बैठकीत चर्चा झाली. 

विधानसभेच्या बहुतांशी जागांचा निर्णय झाल्याने ऑगस्ट पहिल्या आठवड्यात आघाडीचे चित्र स्पष्ट होईल, असे पाटील यांनी जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र, सप्टेंबर उजाडला तरी, जागांचा तिढा सुटलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर झालेल्या बैठकीत सर्वच जागांवरील स्थिती जाणून घेऊन चर्चा करण्यात आली. 

आघाडीच्या सूत्रानुसार काँग्रेसकडील मतदारसंघात राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी तयारी केली आहे. या इच्छुकांनी बैठका, कार्यक्रमांचा सपाटाही लावला आहे. त्यामुळे अशा काही जागा घेण्याची राष्ट्रवादीची रणनीती आहे. 

काँग्रेस-मित्रपक्षांत समाधानकारक चर्चा

काँग्रेस आणि मित्रपक्षांसोबत समाधानकारक चर्चा सुरू आहे. येत्या चार दिवसांत याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. पक्षाकडे आलेल्या 813 इच्छुकांच्या अर्जांबाबत बैठकीत माहिती देण्यात आली. काही जागांमध्ये बदल होऊ शकतो, असेही पाटील म्हणाले. 

हर्षवर्धन पाटील नाराज

इंदापूर विधानसभा मतदारसंघ कॉंग्रेसला सोडण्याची चर्चा झालेली नाही. यासंदर्भात दोन्ही कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते योग्य तो निर्णय घेतला. परंतु, या जागेचा निर्णय झाला नसल्याचे पाटील यांनी पुन्हा स्पष्ट केले. इंदापुरच्या जागेवरून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील नाराजी असल्याची चर्चा आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leaders may agreed with Seats Sharing for Assembly Elections