दिलीप सोपल शिवबंधनात; राष्ट्रवादीचा ज्येष्ठ चेहरा गेल्याने झटका     

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

दिलीप सोपल यांनी सदस्यत्वाचा राजीनामा देण्यासाठी मंगळवारी (ता. 27) विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे औरंगाबाद जिल्ह्यातील गाव गाठले होते. थेट चित्तेपिंपळगाव येथे जाऊन आमदार सोपल यांनी राजीनामा सोपवला होता.

मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप सोपल यांनी आज (बुधवार) अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला सोलापूर जिल्ह्यात मोठा झटका बसला आहे.

दिलीप सोपल यांनी सदस्यत्वाचा राजीनामा देण्यासाठी मंगळवारी (ता. 27) विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे औरंगाबाद जिल्ह्यातील गाव गाठले होते. थेट चित्तेपिंपळगाव येथे जाऊन आमदार सोपल यांनी राजीनामा सोपवला होता. राजीनामा दिल्यानंतर ते आज शिवसेनेत प्रवेश करणार हे निश्चित होते. सोपल यांनी त्यांचा राजीनामा दिल्यानंतर काही क्षणातच विधानसभा अध्यक्ष बागडे यांनी तो स्वीकारला. राजीनामा देतेवेळी शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई, चंद्रकांत खैरे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर व औरंगाबादचे शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार अंबादास दानवे उपस्थित होते. अखेर आज सकाळी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी त्यांनी पक्षप्रवेश करत घड्याळ काढून शिवबंधन बांधले.

काही दिवसांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखतीसाठी सोलापुरात आले होते, तेव्हा आमदार सोपल अनुपस्थित होते, तेव्हाच त्यांच्या पक्षबदलाची चर्चा सुरू होती. या मुलाखतीदरम्यानही पवार यांना पत्रकारांनी सोपलांच्या अनुपस्थितीबाबत विचारता, अशी शक्‍यता त्यांनी फेटाळून लावली होती. त्यानंतरही आमदार सोपल स्पष्ट बोलले नव्हते. वेळ आली की सांगू, असे म्हणाले होते. त्यामुळे त्यांचे नुसतेच तळ्यात-मळ्यात सुरू होते; पण गेल्या पाच-सहा दिवसांपासून मात्र त्यांच्या पक्षबदलाच्या घडामोडी वेगाने घडल्या. सोमवारी बार्शीत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला, त्या वेळी कार्यकर्त्यांनीही त्यांच्या होमध्ये हो मिसळत या प्रवेशाला संमती दिली. कार्यकर्त्यांच्या भावना आणि सध्याची बदलती परिस्थिती पाहूनच आपण हा निर्णय घेतल्याचे आमदार सोपल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. 

काँग्रेसचे माजी आमदार मानेही शिवसेनेत 
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनीही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा दोनच दिवसांपूर्वी केली होती. त्यांचाही प्रवेश आमदार सोपल यांच्यासमवेत झाला. आपल्याला कोणतीही अपेक्षा नाही. पक्ष जो निर्णय देईल, तो आपण मान्य करू, राज्यातील कोणत्याही मतदारसंघात लढायला सांगितले तरी आपण लढू, असेही माने म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MLA Dilip Sopal enters in Shivsena