Jitendra Awhad: 'मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय'; आव्हाडांच्या ट्वीटमुळे खळबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jitendra Awhad

Jitendra Awhad: 'मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय'; आव्हाडांच्या ट्वीटमुळे खळबळ

हर हर महादेव चित्रपटाच्या वादानंतर आता पुन्हा एकदा आमदार जितेंद्र आव्हाड एका नव्या वादात अडकले आहेत. काल (रविवारी) रोजी कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान एका महिलेने आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप केला आहे.

या 40 वर्षीय तक्रारदार महिलेने या कार्यक्रमादरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चुकीच्या पद्धतीने शरीराला स्पर्श करत बाजूला केल्याचा दावा केला. त्यानंतर महिलेने स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पोलिसांनी महिलेला तक्रार दाखल करण्यास सांगितलं. दरम्यान, मुंब्रा पोलीस ठाण्यात 40 वर्षीय महिलेने जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली. याच तक्रारीवरुन पोलिसांनी आव्हाडांविरोधात कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतोय, असं म्हंटलं आहे. ते ट्विटमद्धे म्हणतात की, ''पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही ३५४ ,., मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे,,. लोकशाहीची हत्या .. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत''

दरम्यान पोलिसांनी 72 तासांत माझ्याविरोधात दोन खोटे गुन्हे दाखल केले असा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटमधून केला आहे. तसेच, लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, असंही जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.