मराठी अस्मितेचा हुंकार म्हणजे बाळासाहेब : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 November 2019

राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्टिटरवरती व्टिट करत बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन केले. 

मुंबई : शिवसेना प्रमुख दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांची आज 7 वी पुण्यतिथी आहे. त्यासाठी, जगभरातून बाळासाहेबांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात येत आहे. आज सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्टिटरवरती व्टिट करत त्यांना अभिवादन केले आहे. 

शरद पवार यांनी व्टिट केलेल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे की, प्रादेशिक अस्मितेचा हुंकार स्वाभिमानाने मिरवणारा मराठी माणूस स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केला. समाजकारणाला अग्रक्रम देणारं राजकारण, अमोघ वक्तृत्व, रोखठोक स्वभाव यामुळेच त्यांना अनुयायांचं निरपेक्ष आणि चिरंतर प्रेम मिळालं. त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन!.

दरम्यान, 17 नोव्हेंबर 2012 रोजी बाळासाहेब अनंतात विलिन झाले. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आपल्या नावाचा अजरामर जागर बाळासाहेबांनी केला. सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना, बेरोजगारांना आमदार, खासदार मंत्री बनवणारा नेता म्हणून बाळासाहेबांची महाराष्ट्राला ओळख आहे. बाळासाहेब ठाकरें यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोशल मीडियावरुनही अनेकजण आपल्या आठवणी शेअर करत आहेत.

सोशल मीडियातूनह मोठ्या प्रमाणात त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. तसेच, मुंबईतील शिवाजी पार्क येथील शिवतिर्थावर महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून शिवसैनिक बाळासाहेबांना आंदरांजली वाहण्यासाठी येत आहे. सन 1966 साली आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. बाळासाहेबांचे वडिल प्रबोधनकार ठाकरेंनी बाळासाहेबांच्या पक्षाचे शिवसेना असे नामकरण केले. त्यानंतर, शिवसेनेने कधीही मागे वळून पाहिले नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ncp president sharad pawar paying tribute to balasaheb thackeray