‘लम्पी’वर रामबाण उपाय कडुनिंबाचा धूर! घाबरू नका, काळजी घ्या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

lampi
‘लम्पी’वर रामबाण उपाय कडुनिंबाचा धूर! ‘हे’ करा उपाय; राज्यात २ कोटी गायी, म्हशी

‘लम्पी’वर रामबाण उपाय कडुनिंबाचा धूर! घाबरू नका, काळजी घ्या!

सोलापूर : सध्या महाराष्ट्रासह देशात ‘लम्पी’चा प्रादुर्भाव वाढत असल्याने सरकारने आठवडे बाजार, जनावरांची खरेदी-विक्री, वाहतूक, शर्यती आणि प्रदर्शनावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे पशुपालकांचे अर्थचक्र कोलमडले आहे. राज्यात गायींची संख्या १.४० कोटी तर ५६ लाख तीन हजार ६९२ म्हशी आहे. आतापर्यंत लम्पीमुळे देशातील ७० हजार १८१ जनावरांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील २० जिल्ह्यांमध्ये त्याचा प्रादुर्भाव वाढत असून, त्यात राज्यातील ४२ जनावरे दगावली आहेत. या संकटातील पशुधनाला वाचविण्यासाठी लम्पी येणार नाही, अशा उपायांची गरज आहे. गोठ्यात दररोज कडुनिंबाच्या पानांचा धूर केल्यास व कीटकनाशकांची फवारणी केल्यास त्या ठिकाणी कीटके येत नाहीत, असे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

कडुनिंब हा जणू कल्पवृक्षच...

मराठी नववर्षानिमित्त गुढी उभारताना कडुनिंबाच्या झाडाची डहाळी वापरतात. कडुनिंबाच्या फुलांची मिरपूड, मीठ, गूळ घालून केलेली चटणी खावी, अशी प्रथा आहे. चैत्र महिन्यात झाडांना नवी पालवी फुटते, उन्हाचा कडाका जाणवतो. त्यामुळे शरीरातील उष्णता वाढून विविध आजार होतात. अशावेळी रोगप्रतिकारकशक्ती वाढावी, नवीन वर्ष आरोग्यपूर्ण जावे म्हणून आपल्या पूर्वजांनी पाडव्याला कडुनिंबाचे सेवन करण्यास सांगितले आहे. गोवर, कांजिण्या अशा आजारांवरही कडुनिंब रामबाण ठरले आहे. तसेच पूर्वी स्त्रियांना प्रसूतीनंतर तीन दिवस जेवणापूर्वी कडुनिंबाच्या पानांचा रस दिला जायचा. त्यामुळे मातेला दूधही जास्त येत असे. व्यालेल्या गाईलाही कडुनिंबाचा पाला खायला दिला जातो. कडुनिंबामध्ये आयुर्वेदिक गुणधर्मही असून ते कडू, विपाकी, शीतवीर्य, लघू, मंदाग्निकर-खोकला, ज्वर, अरुची, कृमी, कफ, कुष्ठनाशक म्हणून वापरले जाते.

मोकाट जनावरांना आवरा...

सोलापूर शहरात व तालुक्याच्या ठिकाणी विशेषत: बाजार परिसरात मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. सोलापुरातील रस्त्यांवर सर्रास मोठ्या प्रमाणावर मोकाट जनावरे दिसतात. कोंडवाड्यात जनावरे ठेवण्यावर निर्बंध आहेत, त्यामुळे मोकाट जनावरे गोशाळेत सोडणे अपेक्षित आहे. पण, प्रशासनाकडे वाहन आणि मनुष्यबळाची कमरता आहे. दुसरीकडे, खासगी मालकांची जनावरे देखील रस्त्यांवर सोडून दिले जात असल्याची स्थिती शहरात आहे. राज्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढत असतानाही जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांचे तिकडे लक्ष नाही, अशी स्थिती आहे.

राज्य सरकारकडून मिळेल मदत

लम्पी हा प्राण्यांना होणारा आजार असून, त्यामुळे आतापर्यंत राज्यातील ४२ जनावरांचा मृत्यू झाला आहे. अशा संकटसमयी पशुपालकाला शासनाकडून अर्थसहाय्य मिळावे, असा प्रस्ताव पशुसंवर्धन विभागाने सरकारला पाठविला होता. सोमवारी (ता. १२) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला मान्यता दिली. २०१५ च्या शासन निर्णयानुसार ‘एनडीआरएफ’मधून जनावरांना प्रत्येकी १५ हजारांची मदत मिळणार आहे.

आजारमुक्त होईपर्यंत दूध नकोच

लम्पी आजाराचा मानवाला धोका नाही. म्हशींना आजार होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. एक-दोन आठवडे रक्तात व त्यानंतर शरीराच्या अन्य भागांमध्ये विषाणूचे संक्रमण होते. १८ ते ३५ दिवस हा विषाणू जिवंत राहतो. त्यामुळे बाधित जनावर आजारातून बरे होईपर्यंत त्या जनावराचे दूध पिणे-खाणे टाळावे. आजाराने मृत जनावर जमिनीत आठ फूट खोल खड्डा खणून पुरावे, असेही पशुवैद्यकीय अधिकारी सांगतात.

आजारापूर्वीची लक्षणे...

 1. दुभती गाय, म्हैस असेल तर दूध देणं बंद करते

 2. अंगात ताप वाढतो, पशू चारा खात नाहीत, भूक मरते, पाणी पीत नाहीत

 3. नाकातून आणि डोळ्यांतून पाणी येते

 4. डोळे, मान आणि कास या ठिकाणी १० ते ५० मिमी व्यासाच्या गाठी येतात

 5. तोंड खराब होते, डोळ्याला चिपडे येऊन दृष्टी बाधित होते

 6. पायाला सूज येऊन जनावरं लंगडी होतात, प्रसंगी मृत्यू होतो

रोगाचा असा होतो प्रसार...

 • चावणाऱ्या माश्‍या, डास, गोचीड

 • बाधित जनावरांच्या प्रत्यक्ष स्पर्शाने

 • दूध पिणाऱ्या वासरांना बाधित गाईच्या दुधातून व सडावरील व्रणातून

‘लम्पी’ होऊ नये म्हणून...

 • एकमेकांमधील जनावरांची खरेदी-विक्री टाळा

 • गोठ्यात, परिसरात करा कीटकनाशकांची (फार्मलिन, सोडियम, हायपोक्लोराईट, फिनाइल) फवारणी

 • म्हशीला ‘लम्पी’चा धोका कमीच; गायींमध्ये प्रादुर्भाव जास्त; गोठा ठेवावा हवेशीर व कोरडा

 • गोठ्यांची नियमित करावी स्वच्छता; जनावरांना नियमित द्यावा सकस, पौष्टिक चारा

 • आजारी जनावरांना इतर जनावरांपासून वेगळे (विलगीकरण) करा

 • नागीलीची पाने, काळी मीरी, मीठाचे मिश्रण करून गुळातून दिवसातून दोनदा आठ दिवस पाजावे

राज्यातील पशुधनाची सद्य:स्थिती...

 • एकूण जनावरे

 • १.९५ कोटी

 • गायी

 • १.४० कोटी

 • म्हशी

 • ५६,०३,६९२

 • शेळ्या-मेंढ्या

 • १.३० कोटी

लम्पी आजाराची स्थिती

 • लम्पीबाधित जनावरे

 • २,३८७

 • बरी झालेली जनावरे

 • १४३५

 • लम्पीमुळे मृत्यू

 • ४२

 • पशुवैद्यकीय दवाखाने

 • ४,८५०

 • एकूण डॉक्टर

 • ५,३००

Web Title: Neem Smoke Is The Panacea For Lumpy 2 Crore Cows Buffaloes In The

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..