मोठी ब्रेकिंग! "अंतिम'च्या परीक्षेनंतर "या' दिवसापासून सुरू होणार नवे शैक्षणिक वर्ष

तात्या लांडगे 
Sunday, 13 September 2020

कोरोनामुळे 2020-21 हे शैक्षणिक वर्ष पूर्णपणे विस्कळित झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षा आणि निकाल आता 31 ऑक्‍टोबरपर्यंत जाहीर करण्याच्या दृष्टीने विद्यापीठांनी तयारी केली आहे. विस्कटलेली शैक्षणिक घडी पुन्हा बसविण्याच्या हेतूने नोव्हेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया उरकून 1 डिसेंबरपासून 2021-22 चे शैक्षणिक वर्ष सुरू केले जाणार आहे. 

सोलापूर : कोरोनामुळे 2020-21 हे शैक्षणिक वर्ष पूर्णपणे विस्कळित झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षा आणि निकाल आता 31 ऑक्‍टोबरपर्यंत जाहीर करण्याच्या दृष्टीने विद्यापीठांनी तयारी केली आहे. विस्कटलेली शैक्षणिक घडी पुन्हा बसविण्याच्या हेतूने नोव्हेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया उरकून 1 डिसेंबरपासून 2021-22 चे शैक्षणिक वर्ष सुरू केले जाणार आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या दिवाळी, उन्हाळी सुट्या रद्द करून त्यांना शिकविले जाणार असून वेळेत परीक्षा पार पाडण्याचे नियोजन उच्च व तंत्र शिक्षण विभागाने केले आहे. 

विद्यार्थ्यांना दरवर्षी उन्हाळी, दिवाळी अशा एकूण दोन ते अडीच महिने सुट्या दिल्या जातात. मात्र, कोरोनामुळे विस्कटलेले शैक्षणिक वर्ष सुरळीत करण्याच्या हेतूने सुटीच्या कालावधीतही विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे. शैक्षणिक वर्ष लांबणीवर पडल्याने विद्यार्थ्यांचे वर्षभराचे नुकसान होऊ नये म्हणून उच्च व तंत्र शिक्षण विभागाने हा निर्णय घेतल्याचेही राज्यस्तरीय समितीतील काही सदस्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. याबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांच्याशी चर्चा झाली असून, त्या दृष्टीने विद्यापीठांनी आगामी शैक्षणिक वर्षाचे कॅलेंडरच तयार करायला सुरवात केली आहे. 

दिवाळी अन्‌ उन्हाळी सुट्या रद्द करून होईल अध्यापन 
नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी म्हणाले, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि निकालाची प्रक्रिया 31 ऑक्‍टोबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. नोव्हेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून डिसेंबरपासून शैक्षणिक वर्षाला सुरवात करण्याचे नियोजन आहे. आगामी शैक्षणिक वर्ष सुरळीत होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सर्व सुट्या कमी करून अध्यापन करावे लागणार आहे; जेणेकरून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. 

"अंतिम'च्या परीक्षांचे रेकॉर्ड होणार जतन 
"कोव्हिड-19'च्या संकट काळात अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची घरबसल्या ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तोंडी प्रश्‍न, ऑनलाइन असायन्मेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याचे नियोजन आहे. दरम्यान, या विद्यार्थ्यांना नियमित गुणपत्रक दिली जाणार असून त्यांच्या गुणांकनाची पद्धतही वेगळीच असणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे रेकॉर्ड जतन करून ठेवण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यातील 13 अकृषिक विद्यापीठांना दिले आहेत. परीक्षा ऑनलाइन असून जागेवर तथा ऑनलाइन पद्धतीनेच निकाल जाहीर केला जाणार असल्याने उत्तरपत्रिकांची फोटो कॉपी घेण्याची गरज विद्यार्थ्यांना भासणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची कोट्यवधी रुपयांची बचत होण्यास मदत होईल. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The new academic year will start from December