राज्य नाट्य स्पर्धेतून संस्कृत रंगभूमीवर नवनवीन प्रयोग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Drama Competition

संस्कृत रंगभूमीला मोठी पंरपरा लाभली आहे. हीच परंपरा जोपासण्यासाठी राज्य सरकारतर्फे राज्य नाट्य स्पर्धेंतर्गत संस्कृत नाटय स्पर्धेचे आयोजन केले जाते.

राज्य नाट्य स्पर्धेतून संस्कृत रंगभूमीवर नवनवीन प्रयोग

पुणे - महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित यंदाच्या संस्कृत राज्य नाट्य स्पर्धेतून (Sanskrut State Drama Competition) संस्कृत रंगभूमीवर नवनवीन प्रयोग (Experiment) होत असल्याचे दिसून आले. भरत नाट्य मंदिर १६ व १७ मार्च रोजी पार पडलेल्या फेरीत संस्कृत रंगकर्मींनी वैविध्यपूर्ण विषयांचे सादरीकरण केले.

संस्कृत रंगभूमीला मोठी पंरपरा लाभली आहे. हीच परंपरा जोपासण्यासाठी राज्य सरकारतर्फे राज्य नाट्य स्पर्धेंतर्गत संस्कृत नाटय स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा कोरोनामुळे पुणे केंद्रावरील सहभागी संघांची संख्या तुलनेने कमी होती. एकूण सहा संघांनी यंदा सादरीकरण केले. यातही पुण्यातील तीन संस्थांचाच सहभाग होता, तर कोल्हापूर, सांगली व मिरज येथील प्रत्येकी एका संघाचा समावेश होता. मात्र सादरीकरणातून वेगवेगळे विषय हाताळण्याचा या संघांनी प्रयत्न केला. तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनानंतरची परिस्थितीचा आधार घेत अध्यात्म, विठ्ठल यांवर भाष्य, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सेनेतील पहिल्या महिला गुप्तहेराचा जीवनपट, कौटुंबिक नातेसंबंध, वृद्ध लोकांची मानसिकता आदी विषय या नाटकांतून मांडण्यात आले.

याबाबत ‘गुम्फनम्’ नाटकाच्या दिग्दर्शिका डॉ. रिध्दी कुलकर्णी म्हणाल्या, ‘आमच्या नाटकात एक वृद्ध लेखक आणि त्याच्याकडे पेइंग गेस्ट म्हणून राहायला आलेल्या एका तरुणीची कथा आम्ही मांडली होती. आयुष्याच्या संध्याकाळी निराश आणि उदास झालेल्या वृद्ध लेखकाला ही तरुणी पुन्हा जीवनातली गंमत समजावून देत भरभरून जगायला शिकवते, अशी ही कथा आहे. नाटकाची मांडणी हलकीफुलकी ठेवून त्यातून संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केला.’

प्रायोगिक रंगकर्मींसाठी ही स्पर्धा म्हणजे हक्काचे व्यासपीठ आहे. त्यामुळे स्पर्धेला नेहमीच भरभरून प्रतिसाद मिळतो. मराठी राज्य नाट्य स्पर्धा पार पडल्यानंतर संस्कृत राज्य नाट्य स्पर्धाही उत्साहात पार पडली. प्रेक्षकही नाटके पाहण्यासाठी मोठ्या संख्येने हजर होते.

- राहुल लामखेडे, स्पर्धा समन्वयक, पुणे केंद्र