महासत्तांतर

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

सत्ता स्थापण्यास उत्सुक असलेल्या महाविकास आघाडीने हातातोंडाशी आलेला घास पुन्हा न गमाविण्यासाठी वेगवान हालचाली करत अधिकृतपणे आघाडीची घोषणा केली आणि लगोलग शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सत्तास्थापनेचा दावा केला.

शपथविधी  २८ नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर
मुंबई -  राज्यातील जनतेला एकामागून एक धक्के देणाऱ्या राजकीय नाट्याचा अखेरचा अंक आज सुरू झाला. अजित पवारांनी ऐनवेळी साथ दिल्याने स्थापन झालेले देवेंद्र फडणवीस सरकार, त्यांनीच ऐनवेळी साथ सोडल्याने आज कोसळले. सत्ता स्थापण्यास उत्सुक असलेल्या महाविकास आघाडीने हातातोंडाशी आलेला घास पुन्हा न गमाविण्यासाठी वेगवान हालचाली करत अधिकृतपणे आघाडीची घोषणा केली आणि लगोलग शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सत्तास्थापनेचा दावा केला. २८  नोव्हेंबरला संध्याकाळी ५ वाजता शिवाजी पार्कवर ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. ‘सर्व काही जनतेच्या हितासाठी’ या नावाखाली घडणाऱ्या या अतिवेगवान राजकीय घडामोडींमुळे सामान्य जनताही अवाक् झाली.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

तब्बल वीस वर्षांनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्याच्या मुख्यमंित्रपदावर विराजमान होणार यावर आज शिक्‍कामोर्तब झाले आहे. तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने उद्याच सभागृहात बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्यानंतर राष्ट्रावादीचे बंडखोर नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला. त्यामुळे बहुमतापर्यंत पोचू शकणार नसल्याची जाणीव होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा दिला. त्यामुळे फडणवीस सरकारचा कारभार चार दिवसांत उरकला. त्यानंतर वेगवान घडामोडी घडल्या व नवे सरकार अस्तित्वात येण्यासाठीच्या हालचाली गतिमान झाल्या.

वांद्रे येथील ट्रायडन्ट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची संयुक्‍त बैठक पार पडली. या वेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसह इतर घटक पक्ष व अपक्ष आमदार उपस्थित होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेतेपदी उद्धव ठाकरे यांचे नाव सुचवणारा ठराव मांडला. तर, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी या ठरावाला अनुमोदन देत उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा केली. उद्धव यांनी बैठकीनंतर राजभवनात जाऊन सरकार स्थापनेचा दावा केला. शिवाजी पार्कवर २८ नोव्हेंबरला त्यांचा शपथविधी होणार आहे. त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी ३ डिसेंबरपर्यंत मुदत राज्यपालांनी दिली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीने आज संविधान दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेचा पेच सोडवताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे अभिनंदन करणारा ठरावदेखील संमत केला. याबाबतचा ठराव सुभाष देसाई यांनी मांडला व त्याला काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी अनुमोदन दिले. 

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व इतर घटक पक्षांची महाविकास आघाडी स्थापन करण्याचा ठराव शिवसेनेचे विधिमंडळ पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी मांडला. महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांचे मी अभिनंदन करतो. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही स्वागत करतो. उद्धवजी ठाकरे या राज्याचे नेतृत्व करणार असल्याने महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देतो, अशा भावना शिंदे यांनी ठराव मांडताना व्यक्‍त केल्या. या ठरावाला काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी अनुमोदन दिले.

वरील दोन्ही ठरावाला शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी, प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू लोकभारतीचे कपिल पाटील यांनी अनुमोदन दिले.

राज्यघटनेतील मूल्यांवर आधारित या आघाडी सरकारचा कार्यक्रम राबविणार आहे. मी एकटाच मुख्यमंत्री नाही; तर आघाडीतले सर्व सदस्य मुख्यमंत्री म्हणूनच एकदिलाने काम करू. सहकार्य करू. माझं सरकार सुडाचे राजकारण करणार नाही. शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याचे कर्तव्य आपले सरकार करेल.
- उद्धव ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होत असल्याचा आनंद असून, हे सरकार महाराष्ट्राला प्रथम क्रमांकाचे राज्य म्हणून स्थान मिळवून देईल. या नव्या आघाडीने देशाला नव्या राजकारणाची दिशा दिली असून, संविधानात्मक मूल्ये जोपासणारे नव्या आघाडीचे राजकारण सुरू झाले आहे.
- शरद पवार, ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Maharashtra Government