मास्क नाही वापरला, दंडापोटी मोजले साडेदहा लाख 

प्रमोद बोडके
Monday, 20 July 2020

ग्रामीण पोलिस आघाडीवर... 
यामध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयाने 35 हजार 650 प्रकरणात 58 लाख 26 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. सर्व तहसीलदार कार्यालयाने 9 हजार 823 प्रकरणात 14 लाख 38 हजार 400 रुपयाचा तर सर्व नगरपालिका प्रशासनाकडून 3 हजार 272 प्रकरणात 4 लाख 42 हजार 580 रुपयांचा दंड वसूल केला आहे. 

सोलापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सोलापूर शहर व परिसरातील काही गावांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला. प्रशासनाने आवाहन केल्यानंतरही मास्क न वापरणाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी प्रशासनाने दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील तब्बल 10 हजार 226 जणांनी मास्क वापरला नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्याकडून 10 लाख 52 हजार 580 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सहा ते 20 जुलैपर्यंत ही कारवाई करण्यात आली. आवाहन करुनही नागरिक मास्क वापरत नाहीत आणि आता दंड करुनही मास्कचा वापर टाळतात. नागरिकांमध्ये मास्कचा वापर वाढविण्यासाठी काय शक्कल लढवावी? याचेच कोडे आता प्रशासनासमोर पडले आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा भंग करणाऱ्यांकडून जिल्ह्यात सुमारे 77 लाख 7 हजार 480 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक, तहसीलदार कार्यालय आणि नगरपालिका प्रशासनाकडून याबाबतची कारवाई करण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे, दुचाकी वरुन दोघांनी प्रवास करणे, तीन, चार चाकी वाहनातून मर्यादेपेक्षा जास्त व्यक्तींचा प्रवास, निर्धारित वेळेनंतर दुकाने सुरु ठेवणे, सोशल डिस्टन्सींग न पाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखुचे सेवन करणे याबद्दल ही कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. 

दुचाकीवर दोघांनी प्रवास केलेल्या 787 जणांकडून 3 लाख 57 हजार 500 रूपयांचा दंड वसूल झाला आहे. दुचाकीवर तिघांनी प्रवास- वसूल केलेली रक्कम 10 हजार 500 रूपये, तीन चाकी वाहनात तीनपेक्षा अधिक व्यक्ती- सात हजार रूपये, चार चाकी वाहनात चारपेक्षा अधिक व्यक्ती-40 हजार 900 रूपये, निर्धारित वेळेनंतर दुकान सुरू ठेवलेले- 76 हजार 500 रूपये, दुकानात पाचपेक्षा अधिक व्यक्ती-65 हजार 500 रूपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे- 59 हजार 900 रूपये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केलेले- 66 हजार 100 रूपये, मास्क न लावणारे विक्रेते- 36 हजार 700 रूपये आणि सार्वजनिक ठिकाणी दारू-पान-तंबाखू सेवन- एक लाख पाच हजार 600 रूपये असा दंड वसूल करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No masks used, fined Rs 10.5 lakh